छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वअभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषद व खालापूर तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कार्यालयात सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने खोपोली हद्दीतील आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली असून, एकंदरीत जवळपास 43 माजी सैनिकांना करातून सूट देण्यात आली. यावेळी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण , खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील तसेच सहअधिकारी उपस्थित होते.
सदरील मालमत्ता करमाफी योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करमाफी योजना’ या माध्यमातून सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सैनिकांप्रति आदर होता. त्याच अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट येण्यासाठी ग्रामविकास व नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले असून सरकारने सैनिकांचा सन्मान केला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सरकारने घेतला असल्याने, खोपोली शहर हद्दीतील आजी-माजी सैनिकांना एका मालमत्ता करातून सूट देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी यावेळी दिली. घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांनी प्रशासनाने आभार मानून स्वागत केले.