कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये पाच दिवस खड्ड्यांमध्ये अडकलेल्या युवकाला बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे. पंचगंगा नदीपात्राजवळील एका जॅकवेल शेजारील खड्ड्यात हा तरुण अडकला होता. चक्क चिखल खात आणि मृत्यूशी झुंज देत या तरुणाने खोल खड्यामध्ये पाच दिवस काढले. यानंतर बचाव पथक आणि गावकऱ्यांच्या मदतीने या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या सर्वत्र या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
कोल्हापूरच्या शिरढोणमधील तरुण आदित्य बंडगर हा बेपत्ता झाल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली. पाच दिवसांपासून आदित्यची शोध मोहिम सुरु होती. नातेवाईक व पोलीस तसेच बचाव पथक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, नदी पात्राच्या शेजारी त्याच्या चपला आढळल्याने स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात आदित्यला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली.
नदीपात्रात आदित्य अडकला असला तरी तो जोरजोरात आवाज देत होता. मात्र नदीपात्रात असलेल्या जॅकवेलच्या आवाजामुळे त्याचा आवाज बाहेर ऐकू जात नव्हता. शुक्रवारी (दि. 22) रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. नदीपात्रामध्ये मगरीचा वावर देखील असून गर्द झाडी आहेत. त्यातील एका खड्ड्यामध्ये आदित्य अडकला होता. खड्ड्या जवळून जाणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला त्याचा आवाज कानावर पडला आणि नऊ फूट खड्ड्यात आदित्यला बाहेर काढण्यात आलं. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नानंतर खड्ड्यामध्ये अडकलेल्या आदित्यला तब्बल पाच दिवसांनंतर बाहेर काढण्यात आले.