
सह्याद्रीच्या डोंगर रांगातून रेल्वे धावणार
या मार्गासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगा पार करुन वैभववाडी रेल्वे स्थानक गाठावे लागणार आहे. तब्बल २७ बोगदे या मार्गावर असतील. यांची लांबी अंदाजे २८ किलोमीटर असणार आहे. ५५ उड्डाणपूल, ६८ रस्त्यावरील पूल, ७४ छोटे पूल, ५५ मोठे पूल या मार्गावर उभारण्यात येतील. सर्वांत मोठा बोगदा हा ३.९६ किलोमीटर लांबीचा असेल.
चालू अर्थसंकल्पामध्ये यासाठी केंद्र सरकारकडून रेल्वेसाठी भरीव तरतूद सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन हा
महत्वाचा प्रश्न न सोडविता आल्याने यावर काहीच निर्णय घेता येत नव्हते. मात्र चालू अर्थसंकल्पात यासाठी केंद्र सरकारने रेल्वेसाठी भरीव तरतूद केली असून महाराष्ट्राच्या वाट्याला ३० हजार कोटी रुपये यातून मिळणार आहेत. त्यातील ३ हजार ४११ कोटी रुपयांचा निधी हा केवळ कोल्हापूर-वैभववाडी या मार्गासाठी केंद्र सरकारने दिला आहे. यामध्ये राज्य सरकारचाही तितकाच हिस्सा देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने या मार्गावरील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुमारे १ हजार २०० कोटी रुपये भूसंपादनासाठी निधी लागणार आहे. पुढील वर्षी भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावून या प्रकल्पाला मुर्त रुप दिले जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थान कोल्हापूर वैभववाडी रेल्वे रुळाच्या कामाला गती येईल.
१० स्थानकाचा असा नियोजित मार्ग
वैभववाडी रेल्वे स्थान (नापणे) हे जंक्शन असणार असून या रेल्वे स्थानकातून सोनाळी, कुसूर कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (सिंधुदुर्ग) पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबाबावडा, मार्केटयार्ड, कोल्हापूर, असा हा १०७ किलोमीटरचा नियोजित मार्ग असणार आहे. या मार्गावर १० स्थानके असणार आहेत.
पर्यटन विकासासह शेती, मत्स्य व्यवसायाला मिळणार गती
कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर पर्यटनासह मत्स्य व्यवसाय, आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम, जांभूळ, करवंदे यासह फळे आणि उत्पादनांची थेट वाहतूक पश्चिम महाराष्ट्रातून खानदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत होण्यास मदत होणार आहे. तसेच मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील शेती माल हा कोकणातून पुढे गोव्यापर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे या रेल्वे मार्गाचा प्रवाशांसह मालवाहतूकीसाठी निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे.