भाजपला मोठा धक्का! समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला आहे. अखेर समरजित घाटगे यांनी ‘तुतारी’ हातात घेतली आहे. आज समरजित घाटगे यांचा अधिकृत पक्ष प्रवेश हा कागलमध्ये पार पडला. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. कोल्हापुरातील सामाजिक जडणघडणीत घाटगे घराण्याचे नाव वगळून चालत नाही. या कौटुंबिक भेटीत समरजितसिंह घाटगे यांचे चुलते श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगे यांचीही भेट झाली. सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधून… pic.twitter.com/elu6t79xRb
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 3, 2024
कागलच्या गेबी चौकात आज शरद पवारांची सभा पार पडली. तब्बल १० वर्षांनी शरद पवारांनी या चौकात सभा घेतली. पक्ष प्रवेश झाल्यामुळे समरजित घाटगे यांचं विधानसभेचे तिकीट फायनल समजले जात आहे. कागलमध्ये महायुतीच्या हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर समरजित घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समरजित घाटगे म्हणाले, ”माध्यमांची लोक मला विचारतात की, समोर जे मंत्री महोदय आहेत. जे पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांच्या बाजूने सगळे गट आणि ताकद आहे. महायुती, केंद्र सरकार त्यांच्या बाजूने आहे. मग तुमच्याकडे काय आहे? तर मी त्यांना म्हणालो माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे. मला आणखी काहीही नको आहे.”
पुढे बोलताना घाटगे म्हणाले, “आज परिवर्तनाचा दिवस आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आज कुणीही विजयाचा आनंद साजरा करू नका. पुढील दोन महिने आपल्याला खूप काम करायचे आहे. शरद पवारांचा विचार आपल्याला कागलच्या प्रत्येक घरात घेऊन जायचा आहे. प्रत्येक घराघरात आपल्याला तुतारी पोहोचवायची आहे. त्यासाठी आपण काम करूयात.”
समरजित घाटगे हे गेले १० वर्षे विधानसभेची तयारी करत होते. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेला गेल्याने घाटगे हे अपक्ष लढले. तेव्हा त्यांनी जवळपास ८८ हजार मते घेतली. मात्र त्यानंतर राजकारणात फाटाफूट झाली. अजित पवार हे थेट महायुतीत सामील झाले. त्यामुळे ही कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. कारण सध्या तिथे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार महायुतीत आहेत. इथे यंदाही आपल्याला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच समर जित घाटगे यांनी तुतारी हातात घेतली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढले आहे.