
कोल्हापूर महानगरपालिकेत तिरंगी लढत
महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र
कोल्हापूर: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकींच्या मालिकेनंतर अखेर महायुतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आज सायंकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे कोल्हापूरमध्ये आता महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या एकूण ८२ जागांपैकी भाजप ‘मोठा भाऊ’ ठरला असून भाजप ३६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेला ३० जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महायुतीतील नेत्यांमध्ये सातत्याने बैठकांवर बैठका सुरू होत्या. अखेर सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर जागावाटपावर यशस्वीपणे पडदा पडला.
दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितपणे निवडणूक लढवत असून या आघाडीत काँग्रेसचे उमेदवार संख्येने अधिक असणार आहेत. तिसऱ्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष यांचा समावेश आहे.
महायुतीच्या पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका घेतली. “आम्ही जिद्दीने ८१ उमेदवार निवडून आणण्यासाठी हाडाचं काडं आणि रक्ताचं पाणी करू. पाच वर्षांपूर्वी निवडणूक झाली असती, तर इतके इच्छुक तयार झाले नसते. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल,” असे ते म्हणाले. तसेच तिन्ही पक्षांचे प्रमुख प्रचारासाठी कोल्हापुरात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना विरोधक निधी कसा आणणार, असा सवाल करत त्यांनी “मोठ्या गप्पा मारून विकास होत नाही,” असा टोला लगावला. लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये देण्याचे वचनही त्यांनी पुन्हा दिले.
काँग्रेसच्या एका नेत्याने यावेळी विरोधकांवर टीका करताना, “क्रॉस व्होटिंग झालं तर राजीनामा घेणार म्हणणं लोकशाहीला धरून नाही,” असा टोला सतेज पाटील यांना लगावला.
खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, “उद्या सकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.” महायुतीचा जाहीरनामा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या ‘टॅगलाईन’वर टीका करताना त्यांनी “कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं अशा घोषणांवर आता कोल्हापूरकर विश्वास ठेवणार नाहीत,” असे स्पष्ट केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “महायुती काय करते याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आम्ही अतिशय तगडे उमेदवार दिले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मंत्री आणि आमदार महायुतीचे असल्याने कोल्हापूर शहरासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”
तिन्ही पक्षांकडून अधिकाधिक जागांवर दावा असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास वेळ लागला. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सहभाग घेतला. ८१ जागांच्या वाटपावर, पक्षनिहाय ताकद आणि प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर भाजप ३७, शिवसेना ३० आणि राष्ट्रवादी काँग्रेस १४ असा एक पर्यायी फॉर्म्युला ठरला. एकूणच, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे रणसंग्राम आता अधिकच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.