
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाकडे वळण्यासाठी अनेक युवकांनी गोठे बांधून दूध उत्पादन उद्योग सुरू केला आहे. मात्र, जनावरांसाठी पिकवलेली ओली वैरणदेखील जंगली प्राणी खाऊन टाकत असल्याने बागायती शेतकरी अधिकच हैराण झाले आहेत. वैरण नष्ट झाल्याने दूध उत्पादनावरही परिणाम होत असून दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. शिरगाव व धामोड परिसरात रानगव्यांचे मोठे कळप शेतात शिरून कोवळी पिके पूर्णपणे नष्ट करत आहेत. काही शेतकऱ्यांनी विद्युत कुंपण, आवाज करणारी साधने, रात्री पहारा, प्रकाशयोजना अशा विविध क्लुप्त्या वापरून पिके वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या उपाययोजनांनाही जंगली प्राणी न जुमानता शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. जर वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर दाजीपूर अभयारण्यालगतच्या भागातील शेती आणि पशुसंवर्धन व्यवसाय गंभीर संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शिराळे वारूण ते शित्तूर वारूण दरम्यानच्या रस्त्यावर गव्यांनी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही काळ रस्ता अडविल्याचे चित्र पाहायला मिळाले. शित्तूर वारूण परिसरामध्ये रोज नित्याने नागरिकांना गव्यांच्या कळपाचे दर्शन होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने शिराळे वारूण येथील आठवी ते दहावीमध्ये शिकणारे हायस्कूलचे विद्यार्थी शित्तरकडे येत होते. बाद्याच्या ओढ्यानाजीक रस्त्याच्या खालच्या बाजूला रस्ता ओलांडण्यासाठी गवा थांबला होता.
सुदैवाने रस्त्याच्या एका टोकाला असलेल्या दोन शेतकऱ्यांनी शाळेला येणाऱ्या या विद्यार्थ्यांना आहे. तिथेच थांबण्यास सांगितल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र अगदी काही अंतरावर गव्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी भयभीत झाले होते.
मागच्या वर्षी याच ठिकाणी मयूर यादव या युवकावर गव्यांनी जोरदार हल्ला केला होता. अवघ्या वीस दिवसांपूर्वी गव्याच्या हल्यांत शिवाजी चिंचोलकर हा शेतकरी मरता मरता वाचला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. आणखी कितीजण दगावल्यानंतर वन विभागाला जाग येणार.? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.