
असळज परिसरासह गगनबावडा तालुक्याचा पश्चिम भाग, धुंदवडे भाग भीतीच्या छायेत आहे. कावळटेक येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांचा बैल गावाजवळच्या कावळटेक परिसरात चरण्यासाठी सोडला होता. याचवेळी बिबट्याने हल्ला करून बैलाला ठार केले. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने पाहणी केली. त्यांनी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन झाले असून, तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला नुकतेच वनविभागाने जेरबंद केले आहे. शहरात जरी हा थरार थांबला असला तरी, गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र बिबट्याची उपस्थिती नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. विशेषतः अणदूर-धुंदवडे मार्गावरून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच सोशल मीडियाद्वारे माहिती देवून जनतेला सतर्क केले जाते. तालुक्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ रात्रीच्या वेळी शेतात किवा घराबाहेर जाण्यास घाबरत आहेत. पहाटे ऊस तोडणीसाठी जाणारे मजूर भीतीच्या छायेखाली आहेत. पाळीव जनावरे बिबटचाच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांना या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गगनबावडा तालुक्यात बिबट्याचे तीन ते चार ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. मात्र तरी सुद्धा वन विभागाने तालुक्यातील जनतेच्या सुरक्षे संदभर्भात अजूनही ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे तालुक्यातील संपूर्ण लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चारायला सोडणेही बंद झाले आहे, यावरती लवकरात लवकर वन विभागाने उपायोजना करायला हवी अशी मागणी जोर धरत आहे.सांगशी सैतवडे परिसरासह गगनबावडा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर धोकादायक असून नागरिकावर चिवट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा.
– राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सांगशी