महायुतीनंतर 'मविआ'समोर बंडखोरी राखण्याचे आव्हान; वरिष्ठ नेत्यांना इचलकरंजीत करावी लागणार कसरत!
इचलकरंजी/राजेंद्र पाटील: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. उमेदवारी न मिळाल्याने महायुतीमध्ये सुरुवातीला नाराजी सत्र सुरू झाले, आता याचे लोण महाविकास आघाडीमध्ये पहावयास मिळत आहेत. राहुल आवाडे यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर आवाडे विरोधक एकवटले आणि महायुतीतच बंडखोरीची ठिणगी पडली. आता मदन कारंडे यांच्या उमेदवारीनंतर माजी आमदार अशोक जांभळे गट आक्रमक पवित्रा घेत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी धनत्रयोदिनी युती आणि आघाडीतील बंडखोर अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीने राहुल आवाडे यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाने आवाडेंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. निष्ठावंत विरुद्ध उपरा उमेदवार अशी तुलना करीत आवाडेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला गेला. नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि हळवणकर आवाडे यांच्यातील मनोमिलन घडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इचलकरंजीत यावे लागले. बावनकुळेंच्या मध्यस्थीनंतर हळवणकर गट रिचार्ज झाला, मात्र भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी पदाचा राजीनामा देऊन आवाडे विरोधकांना एकत्रित करून विरोधकांची मोट बांधली जाते का याची चाचपणी सुरू केली. अशा वातावरणात शिवसेना (शिंदे गट ) चे जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगत महायुतीला धक्का दिला हे वादळ अवघ्या चार दिवसात संपले मुख्यमंत्री शिंदे यांनी रविंद्र माने यांना पुनर्वसनाचा शब्द देऊन महायुतीसोबत राहण्याचा सल्ला दिला.
आता राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पदाचा राजीनामा देत त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जांभळे गटाने ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती बरोबरच महाविकास आघाडीतील नाराज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे येणार आहेत. या मतदारसंघातील खरी लढत ही दुरंगीच असणार आहे. महायुतीचे राहुल आवाडे विरुद्ध महाविकास आघाडीचे मदन कारंडे अशी ही लढत होणार असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.