इचलकरंजी मतदारसंघ (फोटो- ट्विटर)
इचलकरंजी : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप, वंचित बहुजन आघाडीने आणि राज्यातील तिसरी म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान इचलकरंजीत महायुतीमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. मध्यंतरीचा काही काळ वगळता इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन वेळा, तर भारतीय जनता पार्टीने दोनवेळा या मतदार संघावर वर्चस्व मिळविले होते. सन १९८५ पासून जवळपास चार दशकांहून अधिक काळ सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आ. प्रकाश आवाडे यांनी या मतदार संघावर अधिराज्य गाजवले आहे. आता प्रकाश आवाडेंचे पुत्र तथा आवाडेंची तिसरी पिढी डॉ.राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीत अंतर्गत कुरघोड्या अद्याप सुरुच आहेत. तिरंगी लढतीत आवाडेंना भाजप अंतर्गत बंडाळीला मुकाबला करावा लागणार आहे.
सन १९७८ मध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी अर्स काँग्रेसतर्फे पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. त्यानंतर १९८० मध्ये राज्यातील पुलदचे सरकार पडल्याने मध्यावधी निवडणूका लागल्या आणि कल्लाप्पाण्णा आवाडे पुन्हा अर्स काँग्रेसतर्फे विजयी झाले. सण १९८०-८१ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत आवाडे यांनी राष्ट्रीय काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९८२ ला वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात उद्योग राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ ला हत्त्या झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवीन फतवा काढत राजीव गांधी यांनी ज्या उमेदवाराला विधानसभा मतदार संघात कमी मते मिळाली, त्या ठिकाणचा उमेदवार बदलण्याचा आदेश निघाला. त्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे तिकिट कापले गेले. त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून १९८५ ला प्रकाश आवाडे यांना या विधानसभा मतदार संघात उभे केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवून जिंकली.
सुरुवातीपासून आवाडे घराण्याची या मतदार संघावर एकहाती पकड राहिली होती. कल्लाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे यांच्यानंतर आता राहुल आवाडे नशिब आजमावत आहेत. महायुतीत अंतर्गत कलह असतानाही आवाडेंनी मोठे धाडस करुन भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. अद्याप महायुतीत अंतर्गत कुरघोड्या सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आवाडेंना विजयाची पुर्ण खात्री आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. तिसर्या आघाडीचा पर्याय पुढे आल्यास महायुती अंतर्गत मताची विभागणी होऊन त्याचा फायदा कोण उठविणार, हे पहावे लागणार आहे.