'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन
मुंबई : मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही आणि योजनेतून कुणाचेही नाव वगळले जाणार नाही, अशी माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’च्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता सहाव्या हफ्त्यापासून…
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा छाननी होईल, असे म्हटले जात होते. त्यावर आता तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्याने चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात याच योजनेला केंद्रस्थानी ठेवून महायुतीने आपला प्रचार केला होता. मात्र, आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जाची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे. तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितले जात आहे. यावर लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा होणार नाही, असे आदिती तटकरे म्हणाल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या विजयामागे अन्य घटकांसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबुज सध्या सुरू झाली आहे.
अटींची सुरू झाली चर्चा
लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का? कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जात आहे का? असे निकष तपासून लाडक्या बहिणीची यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली. अशाप्रकारचे निकष लावले, तर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होऊ शकते.
हेदेखील वाचा : निवडणुकाही झाल्या आता ‘लाडक्या बहिणीं’ना प्रतिक्षा सहाव्या हफ्त्याची; 1500 की 2100 संभ्रम कायम…