फोटो - टीम नवराष्ट्र
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या विजयामागे अन्य घटकांसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबुज सध्या सुरू झाली आहे.
हेदेखील वाचा : निवडणुकाही झाल्या आता ‘लाडक्या बहिणीं’ना प्रतिक्षा सहाव्या हफ्त्याची; 1500 की 2100 संभ्रम कायम…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाँच केली. परिणामी, गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतही ही बहुचर्चित योजना गेमचेंजर ठरणार, असा दावा सत्ताधारी पक्षाचे समर्थक करत होते. ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार, प्रशासनानेही मोठी तत्परता दाखवली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महत्त्वपूर्ण ठरली.
आता या लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते 7 हजार 500 रुपये खात्यात जमा झाले. जुलै व ऑगस्ट महिन्यांचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला.
दरम्यान, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीतच खात्यात जमा केले आहेत. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेचे पैसे दीड हजार रुपयांवरून 2 हजार 100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
अटींची सुरू झाली चर्चा
लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का? कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जात आहे का? असे निकष तपासून लाडक्या बहिणीची यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली. अशाप्रकारचे निकष लावले, तर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होऊ शकते.
1500 की 2100 प्रतिक्षा कायम…
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांहून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का, अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने, डिसेंबरचा हप्ता दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑगस्टमध्ये मिळाला होता पहिला हफ्ता
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हफ्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Election Scam: सहा महिन्यांत 47 लाख मतदारांचा फरक कुठून आला? विरोधकांचा EC ला थेट सवाल