बार्शी : बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरीसह तालुक्यात सर्वत्र सोमवार मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये ओढ्यास पूर आला होता. बार्शी शहरातील वाहतूकही काही काळ बंद होती. बुधवारी दुपारनंतर श्रीपत पिंपरी येथे घोरओढ्यास पूर आला होता. श्रीपत पिंपरी येथील ग्रामस्थ नेहमीप्रमाणे सकाळी शेतात कामास गेले होते. परंतु सायंकाळी घरी परतत असताना गावातील ओढ्यावरून पाणी वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने गावातील निखिल महादेव कुंभार, पोपट बाबुराव घाडगे, अनुसया पोपट घाडगे, दिलीप ताकभाते, प्रविण भारत क्षीरसागर हे पाच जण वाहत्या पाण्यात वाहून गेले. त्यातील काहींना पोहता येत असल्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवला तर आप्पासाहेब लोंढे, शिवाजी भीमराव घाडगे, प्रकाश कुंभार यांनी देवदूत बनून पाण्यातील बुडणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवला.
केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच यांचा जीव वाचला अशी भावना गावात व्यक्त केली जात होती. या घटनेने प्रशासनानेही सुटकेचा निष्वास सोडला. सोमवार मंगळवारी शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. सध्याच्या घोरओढ्यास प्रचंड मोठा पूर आला होता. बार्शीसह कासरवाडी, कव्हे, तकोरफळे येथील वाहत जाणारे पाणी श्रीपत पिंपरी येथील ओढ्यास मिळते. हे पाणी गावात येण्यास पाच सहा तासाचा अवधी लागला. म्हणून सकाळी शेतात काम करणारे हे व्यक्ती अडकून पडले होते.
परंतु घरी जाण्याच्या ओढीने पुलावरून घरी परतत असताना निखिल कुंभार, पोपट गाडगे, अनुसया घाडगे, दिलीप ताकभाते, प्रवीण क्षीरसागर हे पाण्यातून वाहून गेले. त्याचवेळी आपल्या जीवाची पर्वान करता पाण्यात उड्या घेत आप्पासाहेब लोंढे, शिवाजी घाडगे, प्रकाश कुंभार यांनी या पाच जणांचे प्राण वाचवले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भारत ताकभाते, आप्पा ताकभाते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचे प्राण वाचल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सायंकाळी तहसीलदार सुनील शेरखाने यांनी घटनास्थळी भेट दिली.