शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरात 6 महिलांना विजेचा धक्का बसला. या महिला शंकरपूरच्या शेतशिवारात धानपीक रोवणी करत होत्या. त्यात महिला मजूर जखमी झाल्या. या महिलांवर देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि. 19) सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जखमी झालेल्या महिलांमध्ये प्रतिभा प्रल्हाद सहारे, आरती विलास सहारे, नेहा विलास सहारे, अनिता अनिल धोंडणे, प्रिया सुभाष वालदे यांचा समावेश असून, या सर्व महिला शंकरपूर येथील रहिवासी आहेत. सध्या या सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. शंकरपूर येथील शेतकरी प्रल्हाद सहारे यांच्या शेतातील धान पिकाची रोवणी सुरू आहे. त्यांच्याच कुटुंबातील 3 महिला, तसेच घराजवळील 3 महिला मजूर रोवणी करत होत्या. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. सर्वत्र काळोख पसरला आणि विजांचा भयावह कडकडाट सुरू झाला.
हेदेखील वाचा : मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्याही घटना; मराठवाड्यात गेल्या 3 वर्षांत वीज पडून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू
याचवेळी महिलांच्या सभोवताल विजांचा कडकडाट झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने एक महिला चिखलात पडली. तिला तत्काळ विसोरा येथील खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. उरलेल्या महिलांनाही त्यावेळी फार काही जाणवले नाही. मात्र, घरी आल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला. ही बाब लक्षात येताच त्यांना देसाईगंज येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या महिलांवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर शनिवारी त्या सर्व 6 महिलांना डिस्चार्ज देण्यात आला.
वीज पडून 204 जणांचा मृत्यू
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथे पाऊस, अवकाळी, गारपीट यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना घडत आहेत. मराठवाड्यात तीन वर्षांत वीज पडून 204 जणांचा मृत्यू झाला आहे, तर, वीज पडून ३ हजार २४६ पशूधन दगावले आहेत. पावसाळ्यात वीज पडून सर्वाधिक मृत्यू होतात. नदी नाल्यात पूर आल्याने त्यात वाहून गेल्यानेही मृत्यू ओढवतात. वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच आता शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र