
मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा
उमरखेड तालुक्यात दरवर्षी हजारो हेक्टरवर ऊस उत्पादन घेतले जाते. त्यात मुळावा परिसर हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जाणारा भाग आहे. मात्र, यंदा ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड टोळ्यांचा तुटवडा, ऊस कारखान्यांचे ढिसाळ नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड संतप्त झाले आहेत. दरवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी ऊसतोड टोळ्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी टोळीप्रमुखांच्या मागे साकडे घालावे लागत आहे. त्यासाठी टोळीप्रमुखाला ४ ते ५ हजार रुपये, कारखाना कर्मचाऱ्यांना २ हजार रुपये आणि ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाला ४०० रुपये असा अघोषित खर्च करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. इतका खर्च करूनही मुळावा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्यात पोहोचलेला नाही. उलट, कारखाना कर्मचाऱ्यांशी जवळीक असलेल्या काही शेतकऱ्यांचा ऊस तातडीने उचलला जातो, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती ‘टिपेश्वर’ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन
ऊसकारखाना यंत्रणा, ऊसतोड टोळ्या आणि वाहतूक व्यवस्था यांच्यात कोणताही समन्वय नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्ग सध्या मानसिक तणावात आणि आर्थिक नुकसानीच्या कड्यावर उभा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ऊसापेक्षा खोडवा ऊसाला प्राधान्य, ओळखीच्या शेतकऱ्यांचा ऊस आधी उचलणे आणि सामान्य शेतकऱ्यांची उपेक्षा या प्रकारामुळे ऊसकारखाना यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुळावा परिसरातील शेतकऱ्यांचा एक गट आता या मनमानी कारभाराविरोधात थेट साखर आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली.
आम्ही मेहनतीने ऊस पिकवतो, पण तो नेण्यासाठी टोळ्याच्या आणि कारखान्यांच्या दारात भीक मागावी लागते, ही शोकांतिका आहे. पैसे दिले तरच ऊस उचलला जातो, ओळखी असतील तर आधी नंबर लागतो. हा कारभार थांबला नाही, तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. आम्हाला सवलती नकोत फक्त न्याय्य, पारदर्शक आणि नियोजनबद्ध व्यवस्था हवी आहे.- भय्यासाहेब देशमुख, प्रगतशील शेतकरी, मुळावा असे म्हणाले.