उजनी धरणामध्ये अवैध मासेमारी फोफावली; स्थानिक मच्छीमार आक्रमक, कारवाईची मागणी
वैध मासेमारीला पाठबळ देणाऱ्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. अवैद्य मासेमारीला विरोध करणाऱ्या मच्छिमारांना मासळी बाजारात येऊ न देण्याचा धमक्या देण्यात येत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या.
भिगवण: उजनी धरणामध्ये सुरू असलेल्या अवैध मासेमारीला लगाम घालण्यासाठी येथील धरणग्रस्त व स्थानिक मच्छीमार आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. अवैध मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी यावेळी केली.त्यावर वडाप व पंड्याच्या साहाय्याने अवैद्य मासेमारी करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
स्थानिक मच्छिमारांच्या निर्माण झालेल्या समस्या जाणून घेण्यासाठी दि.२७ रोजी भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थित मच्छिमारांनी अन्यायाचा पाढा वाचला व उजनीतील सामान्य मच्छिमारांच्या व्यवसायात गुन्हेगारीची पाळेमुळे किती घट्ट झाले आहेत याच माहिती देण्यात आली. अवैध मासेमारीला पाठबळ देणाऱ्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. अवैद्य मासेमारीला विरोध करणाऱ्या मच्छिमारांना मासळी बाजारात येऊ न देण्याचा धमक्या देण्यात येत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय..
गेली २८ वर्ष सुरू असलेली अवैद्य मासेमारी व मत्स्यबीज न सुटल्याने मत्स्य संपदा व जैविक साखळी धोक्यात आली होती. सुमारे ५० हुन अधिक माश्यांच्या जाती दुर्मीळ व नामशेष झाल्या होत्या.त्यामुळे स्थानिक व धरणग्रस्त मच्छिमारांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता.तर दुसऱ्या बाजुने प्रदूषण वाढले आहे.ही बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी २०२४ पासुन धरणात शासनामार्फत मत्स्यबीज सोडण्याचा राज्यातील पहिला धोरणात्मक निर्णय घेतला.
तसेच सोडलेले मत्स्यबीज आणि इतर प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी कोणत्याही आकाराच्या वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारीवर बंदी घातली आहे.याचा दृष्य परिणाम यंदा मत्स्य उत्पादन वाढीवर झाला आहे. असे असताना पाणी पातळी कमी होऊ लागताच वडाप व पंड्याच्या साहाय्याने दैनंदिन २० ते ४० टन अवैद्य मासेमारी सुरू करण्यात आली आहे.यामुळे पुन्हा मत्स्यउत्पादन घटून मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे व जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता एन.एम.खाडे यांनी आता वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम उघडण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पोलीस, जलसंपदा,मत्स्यव्यवसाय विभाग,महसूल विभाग,प्रदूषण मंडळ समितीही सोबत घेऊन संयुक्त कारवाई सुरू तर करूच मात्र ३१ एप्रिल नंतर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येईल असे सांगण्यात आले.महांगडे यांनी रात्री अपरात्री देखिल कारवाईस पोलीस सज्ज असतील असे सांगितले.तसेच ज्या कृती संघटनेमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे त्याला नोटीस देणार असुन उजनीत मासेमारीवरून जर कोणता अनुचित प्रकार घडला तर त्या पदाधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
Web Title: Local fishermen demand to administration break the illegal fishery at ujani dam solapur news