जुन्नर : जुन्नर तालुक्यातीलअष्टविनायक पैकी एक असलेल्या लेण्याद्रीमध्ये अजूनही सायंकाळी टाळेबंदी असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक व भाविकांचे हाल होत असून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. लेण्याद्रीतील टाळेबंदी कधी बंद होणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांबरोबर भाविकांना पडला आहे.
– भाविकांची गैरसोय
महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येत असतात सध्या उन्हाचा तडाका वाढत असल्यामुळे तसेच लेण्याद्रीला वर जाण्यासाठी ३०० पायऱ्या चढून जावे लागत असल्यामुळे सायंकाळच्या वेळी लेण्याद्री दर्शनाला पसंती देत असतात परंतु पुरातत्त्व विभागाच्या काहीशा आडमुठे भूमिकेमुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी साडेसहा नंतर भाविकांना जाऊ दिले जात नाही, त्यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची गैरसोय होते.
– मंदिर खुले ठेवावे
राज्यातील किंवा देशातील कोणतेही मंदिर साडेसहा वाजता बंद होत नाही पण तू लेण्याद्री गिरीजात्मक हे मंदिर साडेसहा वाजताच बंद होऊन भाविकांना दर्शन घेऊ दिले जात नाही, त्यामुळे अनेक गणेश भक्त व भाविक यामधून नाराजीचा सूर व संताप व्यक्त होत आहे. इतर मंदिरे रात्री साडेदहा अकरा पर्यंत चालू असतात लेण्याद्री मंदिरात इतक्या लवकर का बंद होते हा प्रश्न नागरिक व स्थानिकांमधून विचारला जात आहे. अष्टविनायक गणपती पैकी हे एकमेव मंदिर असे आहे की, जिथे पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे गणेश भक्तांना सायंकाळी उशिरा दर्शन घेणे शक्य होत नाही, त्यामुळे अष्टविनायक परिक्रमा करणाऱ्या गणेश भक्तांना नाहक मनस्ताप होत असून वेळ असून लेण्याद्रीदर्शन होत नसल्याने जास्तीचा दिवस परिक्रमा करण्यासाठीजात असल्याने आर्थिक भुर्दंडदेखील पडत आहे.
– पायरी मार्गावर पाण्याची सुविधा नाही
पंचवीस रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेऊन पुरातत्त्व विभाग त्या तुलनेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा येथे भाविकांसाठी पुरवत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पायरी मार्गावर पाण्याची सुविधा नाही रात्रीच्या वेळी लाईटची पुरेशी सोय नाही. दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत असून ते गणेश भक्तांना त्रास देत आहेत, अशा समस्यांकडे पुरातत्त्व विभाग डोळेझाक करत असून रोज सायंकाळी 6:30 वाजता मंदिर बंद करून गणेश भक्तांची गैरसोय करण्यात पुरातत्त्व विभाग व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. लेण्याद्री मंदिरातील दर्शनाचा कालावधीत वाढवून इतर मंदिरांप्रमाणे रात्री 10:30 पर्यंत मंदिर खुले ठेवावे, अशी मागणी भाविक भक्त करत आहेत.