रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत झाली. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये नारायण राणे अशी लढत झाली. यामध्ये नारायण राणे हे विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांनी मी ज्या वाटेने जातो तिथे माझे विरोधक फिरकत नाहीत असे मत व्यक्त केले.
नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये विजयाच्या पथावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. नारायण राणे म्हणाले, जिथे पिकलं जात नाही तिथे मी पिकवतो. कोकणात कमळ फुलले बरं वाटतं गोड गोड वाटतं आहे. अबकी बार आने वाले चुनाव मै मेरी बारी है. कोकण जिथे तिथे सर्व काही आहे. मी समाधानी आनंदी आहे. मी ज्या वाटेने जातो तिथे माझे विरोधक फिरकत नाहीत असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
तीन मतदारसंघामध्ये राणेंना आघाडी
नारायण राणे हे पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले आहे. मतमोजणीच्या 17 व्या फेरीनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी 41 हजार 221 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. या 17 फेऱ्यांमध्ये एकमेव तिसरी फेरी वगळता प्रत्येक फेरीमध्ये नारायण राणे यानी जोरदार आघाडी घेतली आहे. त्यातही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन मतदारसंघामध्ये राणे यांना चांगलीच आघाडी मिळाली आहे. नारायण राणे यांनी 41 हजार 221 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.