LPG Crisis:मुंबईत 'गॅस माफिया' सक्रिय! पोलिसांनी १७२ सिलिंडर जप्त करत काळाबाजार उधळला
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावर असलेल्या सूरज वल्लभदास चाळ येथे हा छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा उघडकीस आला.
काळाबाजार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून, गॅस टंचाईच्या काळात सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत झाली आहे.जप्त केलेले सिलिंडर कोणत्या एजन्सीचे आहेत आणि यामागे कोणाचे हात आहेत, याचा तपास प्रशासन करत आहे.
वरळीतील कारवाईदरम्यान उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून, प्रशासनाने यावर कडक भूमिका घेतली आहे. तपासानुसार, हे सिलिंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले जात होते. मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅसचा तुटवडा असताना, अशा प्रकारच्या साठेबाजीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडत आहे. जप्त केलेले सर्व १७२ सिलिंडर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस या रॅकेटचा अधिक तपास करत आहेत.
दाट लोकवस्तीच्या निवासी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर साठवणे हे ‘टाइम बॉम्ब’ सारखे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. निवासी क्षेत्रात ज्वलनशील पदार्थांची अशा प्रकारे साठवणूक करणे अत्यंत धोकादायक आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी आग लागून भीषण जीवितहानी होऊ शकते. नफेखोरीसाठी लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या साठेबाजांविरुद्ध यापुढेही शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण राबवले जाईल आणि कडक गुन्हे दाखल केले जातील.






