Mahant Ramgiri Maharaj's reaction to the Aurangzeb tomb controversy
मुंबई : राज्यामध्ये मागील दोन आठवड्यापासून औरंगजेबाच्या कबरीचा वाद वाढला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार वादंग देखील निर्माण झाला आहे. यामुळे नागपूरमध्ये देखील दंगल झाली. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरु आहे. यामध्ये देखील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यावरुन वाद विवाद झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता औरंगजेब कबर या प्रकरणावर प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी अशा पद्धतीच्या कबरी महाराष्ट्रामध्ये नकोय असे म्हटलं आहे. ते म्हणाले की, “औरंगजेब आक्रांत होता, तो काही भारतीय नव्हता, अशा प्रकारच्या आक्रांत लोकांना आदर्श मानून आराजकता पसरवण्याचे कामे होतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रामगिरी महाराजांनी अमेरिकेचे देखील उदाहरण दिले. ते म्हणाले की, “ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेने ठार मारले. पण त्याच्या कबरीला जागा मिळू दिली नाही. असे आक्रांत लोक कबरीत गेले तर लोक त्याला आदर्श मानतात आणि अराजकता माजवतात त्यामुळे अशा लोकांच्या कबरी नकोत” असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले आहे.
पुढे रामगिरी महाराज म्हणाले की, “औरंगजेबाची कबर काढणं न काढणं हा सरकारचा विषय आहे. ज्या नावाने जेव्हा अराजकता वाढते, त्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात, म्हणून हिंदुत्ववादी संघटनेने हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला काही कारण आहे, जसं नागपूरमध्ये दंगल झाली ती अराजक तत्त्वाने केली आहे. हे ठरवून झालेलं आहे. नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून? अराजक लोकांना आदर्श मानून काही लोक असे प्रकार करतात आणि दंगली घडतात,” असे स्पष्ट मत रामगिरी महाराजांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते व मंत्री नितेश राणे हे अनेकदा टोकाची भूमिका घेत मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त विधाने करतातय याबाबत महंत रामगिरी महाराज म्हणाले की, “कुणी कुणाच्या धर्माविषयी बोलणं हा विषय वेगळा आहे. धर्माबद्दल बोलण्याऐवजी त्या धर्मामध्ये जी अराजक तत्व असतात, त्यांच्याविषयी बोलणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात. पण धर्माच्या नावाखाली कोणी अराजकता निर्माण करत असेल तर त्याला विरोध करणं गरजेचंच असत” असे स्पष्ट मत महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे.