Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.11.2026
Maharashtra to World Breaking News :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. तीव्र ‘अर्नब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा (IMD) मोठा इशारा जारी करण्यात आला आहे.
‘SIR’ मतदार पडताळणी प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांची दिल्लीतील मुख्य आंदोलनाची रणनीती तीव्र झाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या कामांचा प्रशासनाकडून आढावा सुरू केला आहे. विकासकामांना गती देण्याचा निर्णय.यवतमाळ जिल्ह्यात पिकांची आणेवारी ४४ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाकडून अधिकृतपणे दुष्काळसदृश परिस्थितीवर शिक्कामोर्तब, बळीराजा चिंतेत आहे.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा मारून पावणेदहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक.आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’ हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत मलेशियाचा पराभव केला.
31 Oct 2026 05:59 PM (IST)
जगभरातील हवामानावर एल निनो आणि ला निना या नैसर्गिक हवामान प्रक्रियांचा प्रभाव पडत असतो. एल निनोच्या प्रभावामुळे तापमानवाढ आणि पावसातील अनिश्चितता जाणवत असताना आता ला निनाची चर्चा सुरू झाली आहे. भारतासह अनेक देशांतील हवामानावर या बदलांचा परिणाम होऊ शकतो.
31 Oct 2026 05:50 PM (IST)
ICICI बँकेने FD च्या दरांत बरीच वाढ केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना बराच नफा मिळणार आहे. ICICI बँकेने ₹३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात १० बेसिस पॉइंट्सने (०.१०%) वाढ केली आहे. बँकेने विशेषतः निवडक दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. या बदलानंतर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचा मुदत ठेव व्याजदर वाढला आहे.
31 Oct 2026 05:43 PM (IST)
पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. जिल्ह्यातील १० लाख ८५ हजार पशुधनासाठी वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर आहे. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील ८ प्रमुख जलप्रकल्पांच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २ हजार ४०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, चारा उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
31 Oct 2026 05:32 PM (IST)
देशातील नामांकित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कॉमन लॉ ॲडमिशन टेस्टसाठी (CLAT) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बंद होण्याची अंतिम तारीख आज ३१ ऑक्टोबर आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन आज रात्रीपर्यंत आपला फॉर्म आणि अर्ज शुल्क जमा करू शकतात. ‘कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज’ तर्फे आयोजित केली जाणारी ही परीक्षा देशभरातील विविध संस्थांमध्ये ५ वर्षांच्या इंटीग्रेटेड एलएलबी आणि १ वर्षाच्या एलएलएम कोर्समध्ये प्रवेशाचा मुख्य मार्ग आहे.
31 Oct 2026 05:22 PM (IST)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी ठोस पावले उचलावीत. जनतेच्या पैशांची बचत करत शहराच्या विकासकामांना गती द्यावी, असे कडक निर्देश स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देतानाच सभापतींनी महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
31 Oct 2026 04:57 PM (IST)
डिजिटल जगातील सर्वात मोठा आणि धक्कादायक सायबर दरोडा (Crypto Hack) समोर आला आहे. जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मानल्या जाणाऱ्या ‘बायनान्स’ (Binance) वर हॅकर्सनी अतिशय सुनियोजित पद्धतीने डल्ला मारला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॅकर्सनी अवघ्या २० मिनिटांत तब्बल ६.३६ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) किमतीची क्रिप्टोकरन्सी वेगवेगळ्या डिजिटल वॉलेटमधून लांबवली. या ऐतिहासिक चोरीमुळे जगभरातील क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसराली असून, अमेरिकन तपास यंत्रणांसह आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. वाचा सविस्तर...
31 Oct 2026 04:47 PM (IST)
शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह, हीन वक्तव्य केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. कराड येथे युवक काँग्रेसच्यावतीने आमदार गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर टाकण्यात आला. त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी या प्रतिकात्मक पुतळ्याचे लचके तोडल्याचे दाखवत युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना आता अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल,” असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिला.
31 Oct 2026 04:37 PM (IST)
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिधा वाटप केले जाणार आहे. वाचा सविस्तर...
31 Oct 2026 04:27 PM (IST)
दिल्ली हायकोर्टाने विनेश फोगाट यांच्या केसमध्ये भारतीय कुस्ती महासंघाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाटला जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीशीवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी हायकोर्टाने दिला आहे. दिल्ली हायकोर्टात विनेश फोगाटने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पार पडली. दरम्यान यावेळेस हायकोर्टाने हे आदेश पारित केले आहेत. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाने बजावलेल्या नोटीशीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. वाचा सविस्तर...
31 Oct 2026 04:17 PM (IST)
Nagpur News :शहरातील गणेशपेठ परिसरातील टेक्सटाईल पार्क येथे शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीसाठी वापरण्यात येणारी सुमारे ४० मीटर उंचीची क्रेन अचानक कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार जखमी झाले. विश्वनाथ कठाणे (४०, रा. गोंदिया) आणि मुकेश निषाद (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मंतुराम (२६, रा. छत्तीसगड) आणि महेश मिस्त्री हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली.
31 Oct 2026 04:07 PM (IST)
बदलापूर-कटाई रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणीचोरी करून टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टँकर माफियांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींची नावे समोर आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे, एमआयडीसी प्रशासनाने कटाई नाका ते नेवाळी नाका या परिसरातील तब्बल ४७ पाणी कनेक्शन तोडल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर...
31 Oct 2026 04:00 PM (IST)
लातूरमधील उद्योग भवन परिसरातील उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये एका पार्सलचा अचानक स्फोट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामानाची चढ-उतार करत असताना पार्सलचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात पार्सल हाताळणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, कुरिअरच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला आणि संबंधित पार्सलमध्ये कोणते साहित्य होते, याचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:50 PM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली न्यूझीलंडच्या भूमीवर खेळताना दिसतील. भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकली असून, आता ते एकदिवसीय मालिकाही जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:40 PM (IST)
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच चारा उत्पादनाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. चारा लागवडीसाठी योग्य जागांची निवड करून शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चारा उत्पादनाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:30 PM (IST)
ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांचा सोशल मीडियावर त्यंनी शेअर केलेला एका भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:20 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि.01) शहरात येत असून, त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये विभागीय क्रीडा संकुलातील १० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेला सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदान, महापालिकेच्या ३४ इलेक्ट्रिक बस, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सिद्धार्थ उद्यानातील १०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:10 PM (IST)
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारांच्या रक्षणावर आणि वाढत्या दहशतवादावर अतिशय कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. मानवाधिकारांच्या संरक्षणाच्या नावाखाली अनेक देश ज्या प्रकारे दुटप्पी धोरण (Double Standards) राबवतात आणि राजकारण करतात, त्यावर भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे.सविस्तर वाचा
31 Oct 2026 03:00 PM (IST)
न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना आर्वी येथे घडली. गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान आर्वी येथील न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी आर्वी न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कदीर अली रज्जाक अली (४४, रा. काकडधरा) याच्याविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा
31 Oct 2026 02:59 PM (IST)
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण पेटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच ठाकरे शिवसेनेने रुग्णालयाचे उद्घाटन उरकून घेतले. तसेच, पूर्वी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली कोनशीला हटवण्यात आल्यामुळे ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाली आहे.
31 Oct 2026 02:50 PM (IST)
नांदूर मधमेश्वर कालव्यात १०० टक्के पाणीसाठा असूनही पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
31 Oct 2026 02:40 PM (IST)
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून आत्मपरीक्षण सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीत पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊनही अपयश का आले, याचा सविस्तर आढावा घेतला जात असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. तसेच यावेळी भोयर यांनी, 'नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती', असेही स्पष्ट विधान केले आहे.
31 Oct 2026 02:31 PM (IST)
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाकरे सेनेच्या रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, एसओपी प्रमाणे बंदोबस्त लावला आहे. यासाठी यासाठी पाच डीवायएसपी दीडशे पोलीस अधिकारी, दीड हजाराच्या जवळपास कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या 400 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीसी देण्यात आले आहेत. अशी माहिती वाशिमच्या अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांनी दिली आहे.
31 Oct 2026 02:20 PM (IST)
लातूर शहरात धक्कादायक घटना घडली असून उमाटे कुरियर या ठिकाणी कुरियरचे पार्सल घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, दहशतवादी विरोधी पथक दाखल झाल आहे.
31 Oct 2026 02:11 PM (IST)
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मयदित घेण्याचे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे डिसेंबर २०२५ मध्ये नागपूरमधील नगर परिषद आणि पंचायतीमध्ये वाढीव आरक्षणात निवडून आलेले ओबीसी प्रवर्गातील किमान ३४ नगरसेवक गोत्यात येण्याची भीती आहे. ओबीसी आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी न्यायालयाच्या निर्देशामुळे फेरनिवडणुकीची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
31 Oct 2026 02:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील प्रदीर्घ काळ चाललेल्या युद्ध आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इराण (US Iran war) यांच्यातील लष्करी संघर्ष रोखण्यासाठी एका महत्त्वपूर्ण कराराचा प्राथमिक मसुदा अंतिम करण्यात आला आहे. या प्रस्तावित करारात इराणच्या अणुकार्यक्रमावर रोख लावण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेने अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. इराणने करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या सात दिवसांच्या आत आपला उच्च संवर्धित युरेनियमचा साठा एका मान्य तिसऱ्या देशाकडे हस्तांतरित करावा किंवा त्याचा दर्जा कमी करावा, अशी प्रमुख अट या मसुद्यात घालण्यात आली आहे.
31 Oct 2026 01:55 PM (IST)
महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील आर्थिक नियमांमध्ये बदल केला जातो. आता नोव्हेंबर महिना उजाडला आहे. या महिन्यांत नेमके कोणते नियम बदलणार आहेत. GST परिषदेने रिटर्न भरण्याची आणि परताव्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवीन पावलं उचलली आहेत. यामुळे व्यवसायांना कर नोटिसा आणि परताव्यांपासून दिलासा मिळणार आहे. या व्यतिरिक्त असे बरेच नियम आहेत जे बदलले जाणार आहे. ते नियम नेमके कोणकोणते आहेत सविस्तर जाणून घेऊयात.
31 Oct 2026 01:45 PM (IST)
गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाने सप्टेंबरमध्येच डेटशीट (वेळापत्रक) जारी केली होती. पण यावेळी ऑक्टोबर संपत आला असून अद्याप मुले वेळापत्रकाची प्रतीक्षा करत आहेत. या विलंबामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडधड वाढली आहे. फायनल शेड्यूलशिवाय अभ्यासाचे संपूर्ण नियोजन करणे थोडे कठीण जाते. मात्र, मागील ट्रेंड्स पाहता सीबीएसई कधीही अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर डेटशीटची पीडीएफ लिंक सक्रिय करू शकते.
31 Oct 2026 01:35 PM (IST)
पदवीधर मतदारांनी दाखवलेला विश्वास ही केवळ विजयाची पावती नसून मोठी जबाबदारी आहे. पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या अडचणी, शिक्षणातील समस्या आणि प्रलंबित मागण्यांना विधान परिषदेत प्राधान्य देणार आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी दिली.
31 Oct 2026 01:30 PM (IST)
आम आदमी पक्षाने 2027 (AAP)च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections 2027) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ४० उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
31 Oct 2026 01:25 PM (IST)
मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली असून अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी शितल उपरे हिने आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. शितलने अमित सिंह यांच्यासोबत साखरपुडा केला असून, या आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या साखरपुड्याचे आणि रोमँटिक प्रपोजलचे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
31 Oct 2026 01:15 PM (IST)
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा शुभारंभ शनिवारी धर्मध्वजारोहणाने झाला. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, प्रमुख पदाधिकारी आणि संत-महंत उपस्थित होते.
31 Oct 2026 01:10 PM (IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. या अपघातानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे
31 Oct 2026 12:48 PM (IST)
डांगे चौक येथील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये एका महिलेने दुर्धर आजाराला कंटाळून आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. एकता मनोज भांगड (वय ३३) आणि तिचा मुलगा माधव (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
31 Oct 2026 12:36 PM (IST)
गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ किलो गांजा, मोबाइल, रोकड असा मिळून ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आशिष रमेश शिंदे (वय २१) आणि आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ कांबळे (वय २७ रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना स्वारगेट बसस्थानक परिसरात दोघे संशयितरित्या वावरताना दिसून आले. त्यामुळे आशिष शिंदे आणि आशितोष कांबळे याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ३ लाखांचा ६ किलो गांजा, रोकड व मोबाईल असा ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाने केली आहे.
31 Oct 2026 12:24 PM (IST)
मेफेड्रॉनची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल, दुचाकी असा ४ लाख १४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मुशरफ इसाक शेख (वय २५) आणि सोहेल बाबुराव शेख (वय २५ दोघेही रा. काळेपडळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार अमोल सरडे यांनी तक्रार दिली आहे.
31 Oct 2026 12:12 PM (IST)
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात व छातीवर दगडाने प्रहार करून त्याचा निघृण खून करणाऱ्या आरोपीला बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी ३० ऑक्टोबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. व्यंकट बसवंत नक्कावार (वय ३२, रा. हनुमान हिप्परगा, ता. देगलूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पाच हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
31 Oct 2026 11:59 AM (IST)
मेडिकलचे शिक्षण केवळ एमबीबीएस किंवा एमडी/एमएस पर्यंत मर्यादित नाही. एखाद्या विशिष्ट अवयवाच्या किंवा आजाराच्या उपचारांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या व्यक्तीला ‘सुपर स्पेशलिस्ट’ म्हटले जाते. देशातील प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन, मास्टर ऑफ चिरुर्गी (MCh) आणि डॉ. एनबी (DrNB) यांसारख्या प्रतिष्ठित सुपर स्पेशलिटी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट-सुपर स्पेशलिटी म्हणजेच ‘नीट एसएस’ (NEET SS) परीक्षा घेतली जाते.
31 Oct 2026 11:50 AM (IST)
दिवाळीच्या सणानिमित्त पुणे शहरातील गुरुवारची साप्ताहिक पाणी कपात तात्पुरती शिथिल करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. यासदंर्भातील मागणी नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे केली होती. दिवाळीच्या काळात घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि धार्मिक व सांस्कृतिक तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एक किंवा दोन गुरुवारची पाणी कपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
31 Oct 2026 11:40 AM (IST)
केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेच्या तारखा देशभरात जाहीर केल्या आहेत. सरकारने २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या तारखा निश्चित करून जनगणनेची घोषणा केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२:०० असेल. बर्फाच्छादित आणि निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये जनगणना घेतली जाणार नाही. या भागांसाठीच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील,अशी माहिती भारताचे जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी दिली आहे.
31 Oct 2026 11:30 AM (IST)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शनने (IBPS) सर्व्हर एडमिनिस्ट्रेटर ग्रेड डी, असिस्टंट ग्रेड बी आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ग्रेड बी पदांसाठी ‘आयबीपीएस रिक्रूटमेंट २०२६’ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक उमेदवार २९ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
31 Oct 2026 11:20 AM (IST)
देशातील विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि विदर्भाच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणारा अमरावतीतील एअर इंडिया फ्लाइंग अकादमीचा (एफटीओ) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बेलोरा विमानतळावर आकार घेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले. वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व ३४ विमाने विमानतळावर दाखल झाली आहेत.
31 Oct 2026 11:10 AM (IST)
शहरीकरण हा आजच्या आधुनिक जगाच्या विकासाचा मुख्य पाठीचा कणा मानला जातो. वाढती औद्योगिक प्रगती, रोजगाराच्या संधी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जगातील बहुतांश जनता शहरांकडे आकर्षित होत आहे. मात्र, या वेगवान शहरीकरणासोबतच प्रदूषण, अस्वच्छता, वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्यांची वाढ आणि असमानता यांसारख्या गंभीर समस्याही निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरांचा विकास हा केवळ काँक्रीटचे जंगल उभारण्यापुरता मर्यादित न राहता तो शाश्वत (Sustainable), हरित आणि मानवी जीवनमान उंचावणारा असावा, या उद्देशाने दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी जगभरात ‘जागतिक शहर दिन’ (World Cities Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
31 Oct 2026 11:00 AM (IST)
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाचा भाग असलेला सलामीवीर यशस्वी जयस्वाल खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो सध्या भारत ‘अ’ संघाकडून न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध एक अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे १७ आणि ५ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीत त्याला खातेही उघडता आले नाही. यशस्वी शून्यावर बाद झाला हे आश्चर्यकारक नाही, तर त्याच्या फॉर्मबद्दल चिंता आहे. अलीकडेच वेगवेगळ्या सामन्यांमधील नऊ डावांमध्ये यशस्वी चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.
31 Oct 2026 10:50 AM (IST)
सिडको प्राधिकरण क्षेत्रातील विविध नोडमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिडको प्रशासनाने उपाययोजनांचा धडाका सुरू केला आहे. पाण्याचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासोबतच पाण्याचा गैरवापर आणि वितरणातील अनियमितता रोखण्यासाठी आता सर्व ३४ पाणीपुरवठा टैंकर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. तसेच ११ प्रमुख टैंकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत आहे.
31 Oct 2026 10:40 AM (IST)
भारतातील टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने त्यांच्या यूजर्सना आनंदाचा धक्का दिला आहे. कंपनीने 4 नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने अलीकडेच जारी केलेल्या आदेशांचे पालन करत कंपनीने हे नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर देखील नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाईव्ह केले आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 179 रुपये आहे. तर सर्वात महागड्या व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 206 रुपये आहे.
31 Oct 2026 10:30 AM (IST)
देशातील सर्वात मोठे शिक्षण मंडळ असलेल्या सीबीएसई (CBSE) साठी २०२६ हे वर्ष निर्णय आणि त्यांच्या स्पष्टीकरणांचे वर्ष ठरत आहे. मे २०२६ पासून ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत अवघ्या ७ महिन्यांत सीबीएसईला किमान ६ वेळा आपल्या नियमांमध्ये बदल, संशोधन किंवा स्पष्टीकरणे जारी करावी लागली. डिजिटल मूल्यांकनातील वादापासून ते अतिरिक्त गुणांची गणना, त्रि-भाषा सूत्र (थ्री लँग्वेज फॉर्म्युला), पास होण्याच्या गुणांविषयीचा संभ्रम आणि आता इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमात अचानक केलेले बदल यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासन संभ्रमात पडले आहेत.
31 Oct 2026 10:20 AM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने मिडिल ईस्टमध्ये आज त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 8,560mAh बॅटरीसह नवा Honor X9e s स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. याा स्मार्टफोनचे डिझाईन चीनमध्ये लाँच झालेल्या Honor Turbo 5G सारखे आहे. क्वालकॉम प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज असलेल्या नव्या ऑनर स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.
31 Oct 2026 10:10 AM (IST)
स्वच्छ आणि हरित वाहतुकीला प्राधान्य देत महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी राज्य सरकार व्यापक नियोजन करत आहे. पुढील तीन वर्षांत राज्यात ५० हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आवश्यक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे. महामार्गांसह राज्यभर आवश्यक त्या ठिकाणी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
31 Oct 2026 10:00 AM (IST)
केंद्र सरकारने देशातील बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणना २०२७ (Census 2027) च्या प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घराघरांत जाऊन ही जनगणना प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. देशातील बहुतांश भागात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी पार पडेल. जनगणनेसाठी १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता (00:00 तास) ही अधिकृत संदर्भ वेळ निश्चित करण्यात आली आहे.
31 Oct 2026 09:50 AM (IST)
NavIC Navigation System: इस्रोने जीएसएलव्ही-एफ१८ रॉकेटद्वारे एनव्हीएस-०३ नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. यामुळे भारताची स्वदेशी नेव्हिक प्रणाली अधिक मजबूत होईल आणि नेव्हिगेशन सेवांची क्षमता वाढेल.
इस्त्रोने जीएसएलव्ही-एफ१८ यानाद्वारे एनव्हीएस-०३ उपग्रह भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (GTO) स्थापित केला. आयआरएनएसएस मालिकेसाठी नेव्हिगेशन सेवांचे सातत्य सुनिश्चित करण्याकरिता विकसित करण्यात आलेल्या, पुढच्या पिढीच्या नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीमधील एनव्हीएस-०३ हा तिसरा उपग्रह आहे.






