
पुणे/प्रगती करंबेळकर: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले आणि समृद्ध वारसा लाभलेले राज्य आहे. इथला इतिहास, साहित्य, कला, संगीत, खेळ आणि संस्कृती यांचा ठसा केवळ राज्यापुरता न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटला आहे. महाराष्ट्रातील लावणी, पोवाडा, भारूड, कीर्तन, तमाशा यासारख्या पारंपरिक कलाप्रकारांना परदेशी मंचांवर मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तसेच ढोल-ताशा, लेझीम यांसारखी वाद्येही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वाजू लागली आहेत. पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ जसे वडापाव, मिसळपाव, पूरणपोळी, झुणका भाकर, तांबडा-पांढरा रस्सा, उकडीचे मोदक इत्यादी परदेशात लोकप्रिय होत आहेत. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये मराठी पदार्थांची हॉटेल्स सुरू झाली असून स्थानिक लोकही त्यांचा स्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत.
गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, होळी यासारखे सण परदेशातील मराठी मंडळांद्वारे साजरे केले जात असून, स्थानिक नागरिकही या सणांमध्ये सहभागी होत आहेत. हे सण सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्यावर परदेशातील विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरू आहे. त्यांच्या विचारांचा जागतिक पातळीवर प्रसार होत आहे.
या संस्कृतीबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणतात, “जसे शेक्सपियरला जागतिक साहित्यिक मान्यता आहे, तसेच अण्णाभाऊ साठे, पु. ल. देशपांडे यांनाही आंतरराष्ट्रीय स्तर मिळायला हवा. बाबासाहेब आंबेडकर, पु.ल.देशपांडे, यांच्या साहित्याला आंतराष्ट्रीय स्तर मिळणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे युनेस्कोमध्ये महाभारत, रामायण यांचा समावेश झाला तसा मराठी साहित्याचा झाला तर मराठी संस्कृतीचा इतर अधिक देशांवर चांगला प्रभाव पडेल”
महाराष्ट्राची संस्कृती ही केवळ राज्यापुरती मर्यादित न राहता, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवली जात आहे. तिचा स्वीकार, अभ्यास आणि प्रसार हा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. हा प्रसार होण्याचे कारण जागतिकीकरण आणि वाढते तंत्रज्ञान आहे. यामध्ये मोठा वाटा महाराष्ट्रातील त्या व्यक्तिमत्त्वांचा ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या संस्कृतीस पोहचवले आहे. यात लता मंगेशकर, आण्णा भाऊ साठे, सचिन तेंडुलकर अशी बरीच कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांनी आणि खास मराठी मराठी नाटकांनी महाराष्ट्र संस्कृतीला साता समुद्रापार नेण्याचे काम केले आहे. ” असे इतिहास तज्ज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले.
लेखक उत्तमराव इंदोरे यांनी महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्रच्या स्थापनेपासून कशी बदलत गेली. याबद्दल सांगितले. यावेळी ते म्हणाले, “पूर्वी तंत्रज्ञान नसल्यामुळे लोकांची अभिरुची वेगळी होती. तेव्हा पुस्तक नाटक यांना प्राधान्य दिले जायचे परंतु आता तंत्रज्ञानामुळे यात बदल दिसून येतो. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मस ना प्राधान्य दिले जाते. या तंत्रज्ञानाचा फायदा एक झाला आपली संस्कृती जगभरात पसरली आणि मराठी माणसांपेक्षा पश्चिमात्य देश महाराष्ट्र संस्कृतीला जपत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृतीत प्रगती होण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पाऊल उचलेले पाहिजे.”