सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात लाभ कमी मिळत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, त्याबरोबरच केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील वाट सुमारे पन्नास टक्के कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर आठरे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, गेल्या काही वर्षात हवामानातील बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेची अत्यंत गरज आहे, पण एकूण जमा होणारा विमा आणि मिळणारी रक्कम यामध्ये तफावत आहे. त्यात आता केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील स्वतःचा वाटा कमी केल्याने राज्य शासन आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री यांच्या समवेत आम्ही बैठक घेऊन धोरण निश्चिती करणार आहोत. याबाबत महाविकास आघाडी सरकार अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सांगली जिल्ह्यात रेसिड्यु फ्री प्रयोगशाळा
सांगली जिल्ह्यात द्राक्षे आणि डाळींब शेती मोठ्या प्रमाणात आहे, ही पिके निर्यातक्षम होण्यासाठी जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रेसिड्यु फ्री द्राक्षे तपासणी प्रयोगशाळा राज्यशासन उभारणार असल्याचेही मंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.
डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी ५ कोटी
अंकलखोप ( ता.पलूस ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्ती संवर्धन करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे यथोचित स्मारक होण्यासाठी लवकरच आम्ही पाच कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. तर बुर्ली येथील पुलासाठी २५ कोटींची तरतूद केली असून लवकरच या पुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.