सौजन्य - नवराष्ट्र टीम
पलूस : कुंडल ( ता. पलूस ) रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती महेंद्र लाड ( वय ५३ ) यांचे पुणे येथे उपचारदरम्यान निधन झाले आहे. हजारो जणांच्या उपस्थित साश्रुनयनांनी अखेर निरोप देण्यात आला. पुत्र ऋषिकेश व रोहन लाड यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
जिच्या पावलांनी डॉ. पतंगराव कदम शिक्षणमहर्षी म्हणून घडले, जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना ‘भारती’ नाव दिले, अशा भारतीताई लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या , भारती लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी सोनसळ ( ता. कडेगांव ) येथे झाला. डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे पुढे डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले. त्यामुळे भारती संकुल आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे.
घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारती या अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिळून मिसळून असत. त्यांचा विवाह ३ मे १९९३ रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. जवळच्याच पाहुण्यांतच लग्न झाल्याने त्या इथेही लगेच रुळल्या. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे राहिले आहे.
भारती यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. भारती आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुलं. ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात.
भारती यांना १४ एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखे झाले. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरूच ठेवले होते. परंतु शक्य ते सगळे प्रयत्न करुनही २८ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. कुंडल येथील निवासस्थानी सकाळी पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना अश्रु अनावर झाले.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जेष्ठ नेते, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, विराज नाईक , संचालक रघुनाथ कदम, युवा नेते जितेश कदम, राजेंद्र लाड, दिग्विजय कदम यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.