लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या 'त्या' निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून अनेक पुरुषांनी तसेच काही महिलांनी निकषात बसत नसतानाही पैसे घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने सर्वच महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली होती. पण, आता या ई-केवायसीच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
महायुती सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर राज्यात लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे. त्यामुळे ७० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली होती. परंतु, आता सरकारने ई-केवायसीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा : Eknath Shinde : लक्ष्मी घरी येणार! लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला वर्गाची नाराजी नको म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महिलांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे आणखी काही महिने महिलांना पैसे मिळतील, असे आता म्हटले जात आहे. या योजनेचे ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे महिलांना मोठी मदत झाल्याचे समोर आले आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार?
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही योजना बंद होणार असल्याचे भाष्य केले. ‘मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहे. पुरूषांनीही लाभ घेतले. योजनेत पारदर्शकता नव्हती. परिणामी, सरकारवर या योजनेमुळे भार पडत आहे. आता अटी-शर्थी घातल्या जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना बंद होईल. सरकारमधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद होईल’, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.