कोल्हापूर: राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसेंदिवस प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना पसरत असून आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. “कोरोना रुग्णसंख्या वाढली तरी काळजी करू नका, घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, गोंधळून जाऊ नका. राज्यातील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी, राज्यातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे.” त्यामुळं आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
सांगली लोकसभा निवडणूक लढवलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “चंद्रहार पाटील यांचं मी स्वागत करतो. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कामाची भुरळ राज्यातील अनेक तरुणांना पडली आहे. त्यामुळं नवीन येणाऱ्यांचं स्वागत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी भेट घेतली. भविष्यात संघटन दृष्टीने अनेकजण सेनेत दाखल होतील.
“कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होईल. यामुळं कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्राची भूमिका आहे. धरणाच्या उंचीसोबतच नद्यांचं पाणी देखील नियंत्रण करणं गरजेचं आहे. पुढच्या आठवड्यात प्रशासकीय बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय होईल.
वर्धा ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध कायम आहे. कागल तालुक्यातील केनवडे इथं सर्वेक्षणासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. काहीही झालं तरी शक्तिपीठ महामार्ग सरकारला रद्द करायला लावू असा निर्धारही काही शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत प्रकाश आबिटकर म्हणाले, “शक्तिपीठाबाबत एकीकडं शेतकऱ्यांचा विरोध तर दुसऱ्या बाजूला समर्थन असं चित्र आहे. मात्र दोन्ही बाजूचे ऐकून घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल.”
Corona Update : सावधान! कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार; सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पार
गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, याबाबत विचारलं असता ते म्हणाले, आरोग्यमंत्र्यांचं अभिनंदन, सगळ्यांनी चांगलं काम करावं अशी त्यांची भावना आहे. हे अनुकरण करण्यासारखा आहे. योग्य गोष्टींचं स्वागत असेल.
कोरोनाचा होतोय देशभरात विस्तार
मागील अनेक दिवसांपासून जगामध्ये कोरोना डोके वर काढत आहे. चार वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या कोविड-19 च्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. भारतामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.