नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Weather Update News in Marathi: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची धुमशान सुरू आहे. आजही (18 ऑगस्ट) राज्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा कोल्हापूर , रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील खेडजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या-नाले धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. १५ ऑगस्टपासून कोसळणाऱ्या अविरत पावसाचा फटका खेड शहरालाही बसत असून, खेडजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी ५ मीटर तर धोका पातळी ७ मीटर इतकी आहे. सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने शहरात पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण-मच्छी मार्केट परिसरासह शेजारील रस्त्यांमध्ये शिरले आहे.खेड दापोली मार्गावर देखील पुराचे पाणी येण्यास सुरवात झाली असून हा मार्ग देखील पुढील काही वेळात बंद होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धरणी नाल्याला मोठा पूर आला आहे. सुरक्षा कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने जैन गल्ली आणि धरणी परिसरातील दुकाने व घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर येथील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कसारा आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. या पावसामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईकरांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम सखल भागात दिसून येत आहे. सध्या या ठिकाणी पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. तर दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचले आहे. त्यासोबतच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचण्यास सुरुवात झाली.
नवी मुंबईत मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर एपीएमसी परिसर देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांचा लांब च लांब रांगा पाहायला मिळत आहे. तसेच पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडींच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे.
कोकणात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. नारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट दिला असून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. ग्रामीण भागामध्ये समाधानकारक पावसामुळे भातशेती तरारली असून मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून प्रवाहित होत आहे.