Maharashtra Breaking News
18 Aug 2025 05:13 PM (IST)
साळाव–तळेखार महामार्गाची दुर्दशा! सहा महिन्यांपासून उखडून ठेवलेल्या १३ किमी रस्त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला. MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराला नागरिकांचा जाहीर चपराक देत आज अलिबाग येथे प्रचंड पावसात उग्र रास्तारोको पेटला. खड्डे, चिखल, अपघात व प्रवाशांचे हाल यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश अक्षरशः ओसंडून वाहत होता. प्रचंड पावसाची पर्वा न करता घोषणाबाजी, आक्रमक जाहीर इशारे आणि उग्र घोषणांनी परिसर दणाणून गेला. “ढिसाळ कारभार करणाऱ्या MSIDC आणि कंत्राटदाराला यापुढे नागरिक माफ करणार नाहीत; मागण्या मान्य न झाल्यास याहूनही भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल!” अशी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांची गर्जना झाली.
18 Aug 2025 05:00 PM (IST)
दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली. महिला हंडे-कळशी घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आणि अधिकार्यांना जाब विचारला. नंदू परब यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर पाण्याची समस्या सुटली नाही तर एमआयडीसी कार्यालयालाच टाळे ठोकले जाईल.
18 Aug 2025 04:55 PM (IST)
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरात खड्ड्यांच्या समस्येमुळे मोठी दुर्घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून चालक खाली पडला असून त्यात तो जखमी झाला. अपघातात दुचाकीचे तसेच त्यावरील सामानाचेही नुकसान झाले. या प्रकारामुळे नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत असून, तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.
18 Aug 2025 04:45 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार-पाच दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील गड नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी कणकवली-मालवण राज्य मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
18 Aug 2025 04:40 PM (IST)
नेरळ स्थानकाचं आत्याधुनिक सेवा सुविधांनी सुशोभिकरण केलं गेलं आहे. मात्र याचबरोबर सुरक्षेचा प्रश्न अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाने याबाबत योग्य ती सुरक्षा योजना राबवावी असं अशी मागणी नेरळमधील प्रवशांची आहे.
18 Aug 2025 04:35 PM (IST)
मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, गावकऱ्यांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न होत आहे. पनवेल - उरण कडे जाणाऱ्या जेएनपीटी पनवेल महामार्गावर जेडब्ल्यू आर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था पुरवत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत.
18 Aug 2025 04:30 PM (IST)
जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची तुफानी हजेरी – MSIDC व कंत्राटदाराला जाहीर इशारा दिला आहे. साळाव–तळेखार महामार्गाची दुर्दशा! सहा महिन्यांपासून उखडून ठेवलेल्या १३ किमी रस्त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला. MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराला नागरिकांचा जाहीर चपराक देत आज अलिबाग येथे प्रचंड पावसात उग्र रास्तारोको पेटला आहे.
18 Aug 2025 04:25 PM (IST)
मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली आहे.
18 Aug 2025 04:20 PM (IST)
मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनवरुन निघालेली मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणारी श्रीमंत प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात, मुंबईतील पु, लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आलेली आहे. याचे आता दस्तावेजीकरण होईल. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या तलवारीच्या लोकार्पणाचा सोहळा होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, शिवप्रेमींना दर्शनासाठी ही तलवार खुली होईल.
18 Aug 2025 04:15 PM (IST)
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झाले आहे. ते राज्यातील पावसाचा आढावा घेत आहेत. प्रामुख्याने मुंबई अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील शाळांना सुटी देण्यात आली असून रेल्वे तसेच विमानसेवेवरही विपरीत परिणाम झाला आहे.
18 Aug 2025 04:07 PM (IST)
महाराष्ट्रात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
18 Aug 2025 03:56 PM (IST)
AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने २-१ अशी मालिका जिंकली. आता या दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेकडून आपला संघ जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस आणि वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत हे दोघेही या मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे.
18 Aug 2025 03:12 PM (IST)
मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
18 Aug 2025 02:52 PM (IST)
पुणे: गेले काही दिवस पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र मध्यरात्रीपासून पुणे शहरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. क्वचितच पावसाची एखादी सर पाहायला मिळत होती. मात्र काल मध्यरात्रीपासून पुणे शहरात पावसाने प्रचंड जोर पकडला आहे. मुसळधार पाऊस शहरात सुरु आहे.
18 Aug 2025 01:55 PM (IST)
सोमवारी तंबाखू आणि ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. सोमवारी या कंपन्यांचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. केंद्र सरकार ‘पापाच्या वस्तू’ (sin goods) साठी ४० टक्के जीएसटी स्लॅब आणण्याची तयारी करत असल्याच्या वृत्तानंतर तंबाखू आणि ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे. या अहवालानंतर तंबाखू आणि ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
18 Aug 2025 01:45 PM (IST)
इराकच्या मोसुल शहराजवळील अल-खफसा परिसरात जगाला हादरवणारा सत्याचा काळा अध्याय पुन्हा समोर आला आहे. इराकी अधिकाऱ्यांनी येथे एक प्रचंड सामूहिक कबर खोदण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या कबरीमध्ये ४ ते ५ हजार मानवी अवशेष पुरलेले असावेत. २०१४ ते २०१७ या काळात आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या रक्तरंजित नरसंहाराचे हे ठोस पुरावे असल्याचे मानले जात आहे. ही सामूहिक कबर इराकच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी कबर मानली जाऊ शकते. स्थानिक प्रशासन, न्यायव्यवस्था, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि इराकी शहीद फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने या कबरींचे उत्खनन सुरू आहे.
18 Aug 2025 01:35 PM (IST)
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या चार महिन्यांत विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ६३३ वाहने तपासली आहेत. त्यापैकी १८१ वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई केली असून, ०७ वाहने जप्त केले आहेत. यामधून १८ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
18 Aug 2025 01:25 PM (IST)
चीनचे परराष्ट्र मंत्री वागं यी आज (१८ ऑगस्ट) भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. हा दोन दिवसांचा दौरा होणार असून अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि चीनमधील (India China Relation) संबंधामध्ये अलीकडच्या काळात सुधारणा होताना दिसून येत आहे. या दृष्टीकोनातून हा दौरा महत्वपूर्ण असून सगळ्याचे याकडे लक्ष लागलेले आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. यानंतर वांग यी पहिल्यांदाच भारताला भेट देणार आहेत.
18 Aug 2025 01:15 PM (IST)
बिहारमध्ये ‘मत चोरी’चे आरोप आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनर्निरीक्षणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आता नव्या वळणावर पोहचले आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले आहेत. या मतचोरीच्या आरोपांनंतर त्यांनी बिहारमध्ये मतदार हक्क यात्राही सुरू केली आहे. राहुल गांधींच्या यात्रेचा पहिला दिवस आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून काल (१७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेण्यात आली. तसेच राहुल गांधी यांना तीन आठवड्यात माफी मागण्याचे आव्हानही आयोगाकडून करण्यात आले आहे.
18 Aug 2025 01:03 PM (IST)
मागील अनेक दिवसांपासून महायुतीमधील नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंत्रिमंडळामधील अनेक नेत्यांचे घोटाळे समोर आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय गायकवाड हे चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगांसोबतचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यावरुन जोरदार राजकारण देखील तापले आहे. आता संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमिनीच्या घोटाळ्याबाबत मोठा आरोप केला आहे.
18 Aug 2025 12:45 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निवडणुकीत राधाकृष्णन यांचा विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
18 Aug 2025 12:36 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. एनडीएकडे आवश्यक बहुमत असल्याने राधाकृष्णन यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना झाले. पुढील एक-दोन दिवसांत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
18 Aug 2025 12:35 PM (IST)
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भरणार आहे. नवी मुंबईत सोमवारी, 20 ऑगस्ट रोजी जव्हार आणि ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये 22 ऑगस्ट रोजी जनता दरबार होणार आहे.
18 Aug 2025 12:25 PM (IST)
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांना झोडपले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना ही सुखरूप घरी सोडण्याचे ही आदेश जारी करण्यात आले.
18 Aug 2025 12:14 PM (IST)
मराठवाड्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुर आला आहे. पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पशु पालकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही मेलेल्या म्हशी या पाण्यातच आहेत. मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
18 Aug 2025 12:02 PM (IST)
मुंबईला जोरदार पावसाने झोडपले आहे. यामध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून रेल्वे लाईनवर देखील पाणी साचले आहे. दरम्यान, दादरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये लहान विद्यार्थी हे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
Scenes near Dadar. Its only about to get worse. City Infrastructure will be tested big time today #MumbaiRains pic.twitter.com/XBcG0odMbW
— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) August 18, 2025
18 Aug 2025 11:55 AM (IST)
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात नवीन मतदारांची संख्या ४० लाखांनी वाढली, देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय की प्रौढ नागरिकांपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे, असं का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
१. बिहारमध्ये पूरस्थिती असताना इतक्या गडबडीत तुम्हाला तिथं SIR करण्याची काय गरज आहे?
२. महाराष्ट्रात नवीन मतदारांची संख्या ४० लाखांनी वाढली, देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय की प्रौढ नागरिकांपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे, असं का?
३. आणि या प्रश्नांची उत्तरं निवडणूक… pic.twitter.com/3Y8ObYlmJe— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 17, 2025
18 Aug 2025 11:45 AM (IST)
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली. आगीत बस पूर्णपणे जळाली. बसमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
18 Aug 2025 11:35 AM (IST)
मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दादर रेल्वे भाग, अंधेरीतील वीरा देसाई रोड हे पूर्णपणे जलमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे मुंबईचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचना देणार आहेत.
18 Aug 2025 11:25 AM (IST)
मुंबईसह ठाणे भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा परिणाम जनजीवन आणि लोकल व्यवस्थेवर देखील झाला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास बाहेर पडा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पावसामुळे मुंबई पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
18 Aug 2025 11:15 AM (IST)
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमातून आणखी एका अभियानाची घोषणा केली आहे. सासरी त्रास होणाऱ्या सूनेसाठी या लाडकी सून अभियानांतर्गत हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येणार आहे.
18 Aug 2025 11:08 AM (IST)
NAVI MUMBAI | मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला असून नवी मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर एपीएमसी परिसर देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
18 Aug 2025 11:07 AM (IST)
मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर येथील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कसारा आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. या पावसामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईकरांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
18 Aug 2025 10:58 AM (IST)
१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या दिल्लीच्या या स्टार फलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण करताच आपले हेतू स्पष्ट केले की माघार घेणे त्याच्या स्वभावात नाही आणि नंतर एक असा प्रवास सुरू झाला जो नंतर “किंग कोहली” ची कहाणी बनला. बरोबर १७ वर्षांपूर्वी, विराट कोहलीने आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घ्या...
18 Aug 2025 10:54 AM (IST)
RATNAGIRI | कोकणात गेले संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस लागत असून सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपलेआहे आणि किनारपट्टी भागात तुफान पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. ग्रामीण भागामध्ये समाधानकारक पावसामुळे भातशेती तरारली आहे. इतकंच नाही तर मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून प्रवाहित झाली आहे.
रत्नागिरीतील नदी (फोटो सौजन्य - RNO)
18 Aug 2025 10:50 AM (IST)
या आठवड्यात कोणत्या सरकारी नोकरींसाठी शेवटचे अर्ज करण्याचे दिवस आहेत याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये IBPS क्लर्क ते BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समन, UPSC, दिल्ली मेट्रो अशा भरतींचा समावेश आहे. तुमची पात्रता तपासल्यानंतर तुम्ही लगेच या नोकऱ्यांमध्ये अर्ज करावा कारण एकदा संधी गेली की, तुम्ही पुन्हा त्यात सहभागी होऊ शकणार नाही. येथे सर्व भरतींमध्ये रिक्त पदांची संख्या, शेवटची तारीख आणि पात्रता माहितीदेखील दिली आहे. तुम्ही ज्या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहात, ती यादी तपासा आणि शेवटची तारीख संपण्यापूर्वी लगेच अर्ज करा. संपूर्ण यादी खाली दिली आहे जाणून घ्या. बातमी सविस्तर वाचा
18 Aug 2025 10:47 AM (IST)
NAVI MUMBAI | कळंबोली पासून ते बेलापूर पर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या असून गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला आहे. सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ३ दिवस सुट्टीनंतर लोक कामावर परतले असून आज सर्वांना पावसामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने वाहतूक कोंडी असून सकाळपासूनच लोकांना त्रास होत आहे.
18 Aug 2025 10:40 AM (IST)
BULDHANA | बुलढाणा जिल्ह्यात गेले दोन तीन दिवसांपासून जोरदारा पाऊस सुरू आहे. यामुळे मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ असलेल्या कास नदीला पूर आला आहे. . पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून नागपूर ते मुंबई हा महामार्ग वाहतुकीला बंद झाला आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चिखली, मेहकर , सिंदखेड राजा बुलढाणा, संग्रामपूर, देऊळगाव राजा सह इतर तालुक्यात सुद्धा जोरदारा पाऊस सुरू आहे. यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी पूर आला आहे.
18 Aug 2025 10:35 AM (IST)
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील महायुतीने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार पदासाठी काही नावे जाहीर केली आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एनडीएने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या उमेदवारासाठी त्यांच्या पक्षाकडून पाठिंबा मागितला. पण त्याचवेळी इंडिया ब्लॉक आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत रणनीती बैठक घेणार आहे. दरम्यान, निवडणूक समीकरणे आणि संख्याबळामुळे ही निवडणूक आणखी मनोरंजक बनली आहे. बातमी सविस्तर वाचा...
18 Aug 2025 10:25 AM (IST)
तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमधील पावरफुल आणि फीचर-पॅक स्मार्टफोनच्या शोधात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. सध्या तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोनची गरज असेल तर चिंता करू नका. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक अशी ऑफर घेऊन आला आहे, जिथे तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung Galaxy M35 5G घरी घेऊन येऊ शकता. Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण Galaxy M35 5G ची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 844 रुपयांच्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. वाचा सविस्तर
18 Aug 2025 10:13 AM (IST)
आज सकाळी दिल्लीच्या द्वारका परिसरात सुरक्षा दहशतीचे वातावरण होते. दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) द्वारका, सेक्टर ४ मधील मॉडर्न कॉन्व्हेंट स्कूल आणि श्री राम वर्ल्ड स्कूल यांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले. दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी ७:३४ वाजता याची माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. पोलीस याचा पुढील तपास करत असल्याचे ANI ने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे.
18 Aug 2025 10:10 AM (IST)
बिग बॉस 19 या नव्या सीजन मध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहे यांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. बिग बॉस 19 येथे काही अफवा असलेल्या स्पर्धकांची यादी आहे जे कदाचित या वर्षी घरात एंन्ट्री करु शकतात.
18 Aug 2025 10:10 AM (IST)
मागील दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना व तलावांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे..जांभोरा येथील शेतकरी सोपान बाबुराव खरात यांच्या शेताजवळ असलेल्या गट नंबर ५३ व ५४ मध्ये तलाव असुन त्यामध्ये पाण्याचा दाब जास्त वाढल्यामुळे तलाव हा मध्यभागी फुटला असून त्यामुळे खालच्या भागांमध्ये असलेल्या शेकडो एकरवर उभे असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..तलाव फुटून पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन, कपाशी,फळबाग, भाजीपाला यासह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
18 Aug 2025 09:55 AM (IST)
सी.पी. राधाकृष्णन यांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय बोर्डाच्या बैठकीत सर्व सहमतीनं हा निर्णय घेतला गेला.
18 Aug 2025 09:50 AM (IST)
इरफान पठाणने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या असभ्य वर्तनाबद्दल सांगितले की, तो विमानात चढत असताना एका पाकिस्तानी खेळाडूने त्याला कसे छेडले आणि त्याला त्याने कसे योग्य उत्तर दिले. या व्हिडिओने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगवली. हा व्हिडिओ केवळ भारतात व्हायरल झाला नाही तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही खळबळ उडवून दिली. अशा परिस्थितीत इरफान पठाणला पाकिस्तानकडून टीकेला सामोरे जावे लागेल असे वाटत होते, पण घडले उलटेच. त्याला टीकेऐवजी पाठिंबा मिळाला.
18 Aug 2025 09:45 AM (IST)
18 Aug 2025 09:40 AM (IST)
राजधानी दिल्लीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय आईवरच पोटच्या पोराने दोनवेळा अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. आधी मुलाने आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं केलं, त्यानंतर वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला,त्यानंतर आईवरच दोनवेळा अत्याचार केलं असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने आपल्या पोरा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ३९ वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.
18 Aug 2025 09:35 AM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर, टीम इंडिया २०२५ मध्ये आशिया कप खेळणार आहे. या स्पर्धेपूर्वी, स्टार विकेटकीपर फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर होता. निवडकर्त्यांनी आता त्याच्या जागी खेळाडूची घोषणा देखील केली आहे. २०२५ च्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला तेव्हा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला कर्णधारपद देण्यात आले. दुखापतीमुळे किशन इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतरही निवडकर्त्यांना आशा होती की किशन तंदुरुस्त झाल्यानंतर दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल.
18 Aug 2025 09:30 AM (IST)
१८ ऑगस्ट रोजी आज शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होणार आहे. प्रस्तावित जीएसटी सुधारणा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक या सर्वांमुळे शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आठवड्याच्या शेवटी झालेल्या सकारात्मक घडामोडींमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.
18 Aug 2025 09:25 AM (IST)
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच म्हणजे कसोटी मालिका पार पडली. या आधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहलीने t20 फॉरमॅट मधून आणि कसोटी फॉरमॅटमधून क्रिकेटला अलविदा केला आहे तो फक्त आता एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 2026 मध्ये होणारा t20 विश्वचषक आजचा विराट कोहली भाग नसणार हे स्पष्ट आहे. पुढील एकदिवसीय मालिका ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे.
Marathi Breaking news live update : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज, १८ ऑगस्ट रोजी, पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात सध्या मुसळधार पावसाचे प्रमाण पाहायला मिळत आहे. काही सखल भागात पाणी साचण्याची सुरुवात झाली आहे.
आज आठवड्याचा पहिला दिवस असून, मुंबईकरांना सकाळच्या वेळेस कामावर जाताना पावसामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचे सांगितले आहे.