Solapur Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दोघांनी आत्महत्या केली.
Solapur Rain Update : बार्शी : महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. अति मुसळधार झालेल्या पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले सर्व पीक वाहून गेले असून पीकाऊ जमीन देखील वाहिली आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीने केवळ शेती पिकांचेच नाही, तर शेतकऱ्यांचे जीवनही उद्ध्वस्त केले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून बार्शी तालुक्यात एकाच दिवशी (24 सप्टेंबर) दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यात पुराच्या पाण्यातून घरात शिरलेल्या विषारी सापाच्या दंशाने आणखी एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दहिटणे येथील लक्ष्मण काशीनाथ गवसाने (वय 58) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर कोरडवाहू शेतीत पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शारीरिक आजार आणि मानसिक तणावाखाली असलेल्या गवसाने यांनी 24 सप्टेंबर रोजी सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
कारी येथील शेतकरी शरद भागवत गंभीर (वय 45) यांची साडेतीन एकर शेती होती. त्यांनी पेरू व लिंबूचे बागायती पीक घेतले होते. मात्र, सलग पावसामुळे संपूर्ण बाग नष्ट झाली. बँक आणि हातउसने असे सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना उत्पन्नाची कोणतीही आशा न उरल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
म्हणून दोघांनी केली आत्महत्या
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे झालेले पीक नुकसान आणि कर्ज फेडण्याची असह्य विवंचना हेच या दोन्ही आत्महत्यांमधील प्रमुख कारण आहे. स्थानिक पोलिस या दोन्ही घटनांचा आकस्मिक मृत्यू म्हणून तपास करत आहेत.
पाथरी येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा बळी
या दुर्दैवी घटनांची मालिका इथेच थांबली नाही. उत्तर सोलापूरमधील पाथरी गावात सीना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून विषारी साप घरात शिरल्याने शेतकरी केरप्पा बजरंग बंडगर यांना सापाने दंश केला. 20 सप्टेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महा पुरामुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, त्यातून वाढलेल्या आत्महत्या आणि नैसर्गिक आपत्ती तील दुर्देवी मृत्यू यामुळे सोलापूर जिल्ह्यात सध्या भयावह आणि हळहळ जनक परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
Web Title: Maharashtra suffers from drought two farmers commit suicide on the same day in barshi