
ईशान्य ते मध्य भारतातील अनेक राज्यांत पाऊस
हवामान विभागाने, राज्यातील बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच धुळे, नंदुरबार, नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीनंतर आता पावसाने थोडी उघडीप घेतल्याने राज्यातील अनेक भागांत उष्णता वाढली आहे. काही ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळू शकतो. आज राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी अनेक भागांत उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने अरबी समुद्रातील मच्छीमारांसाठीही सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. १५ जुलैपर्यंत पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या काही भागांत ताशी ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वायव्य, पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील सहा ते सात दिवस मान्सूनची सक्रियता तुलनेने कमी राहू शकते. विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे राज्यातील पावसाचा जोरही कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात पुणे, घाटमाथा आणि कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली होती. काही ठिकाणी ५०० ते ६०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. मात्र, पण मागील ४८ तासांत घाटमाथ्यावरील बहुतांश भागांत पावसाची नोंद अत्यल्प झाली आहे. हवामान विभागाच्या मते, ही परिस्थिती तात्पुरती असून हवामान प्रणाली कमकुवत झाल्याचा हा परिणाम आहे.