Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू
माहितीनुसार, चाकण एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले २० तरुण आणि ६ तरुणी भाड्याने घेतलेल्या मिनी बसमधून देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १२.१५ वाजता हा गट पाटणूस टी-पॉईंट येथे पोहोचला. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी देवकुंड परिसरात प्रवेशबंदी असल्याचे सांगून त्यांना परत पाठविले. (फोटो सौजन्य: Pinterest)
मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून या गटाने स्थानिक गाईडची मदत घेत म्हसेवाडी येथील चोरवाटेने देवकुंड परिसरात प्रवेश केला. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गटातील गोपाळ रामलाल राठोड (रा. दामला तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि विष्णू विलास ढोक (रा. जयपूर, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे दोघे पाण्यात उतरले. विष्णू ढोक याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गोपाळ राठोड पुढे गेला. मात्र, बुडणाऱ्या विष्णूने गोपाळला मिठी मारल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, दोघेही खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, स्थानिक बचाव पथक आणि अनुभवी बुडे घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या घटनेमुळे पावसाळ्यात देवकुंड परिसरात लागू करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट मनाई करूनही पर्यटक चोरवाटांचा वापर करून धोकादायक ठिकाणी जात असल्याने अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे पर्यटकांनी नियमांचे पालन करून स्वतःच्या जीवाशी खेळ करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे






