Maharashtra Weather Alert: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेनागरिकांनी विशेषतः मोकळ्या परिसरात असताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. तर, काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ऊन असे चित्र पाहायला मिळणार आहे. एकीकडे काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी अनेक भागांत पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किमीमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात आज काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असे चित्र नाही. स्थानिक पातळीवर ढगांची स्थिती आणि पावसाची तीव्रता बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
१८ आणि १९ ऑगस्टलाही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामध्ये कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्याने आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या भागातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वारे सुरू असताना नागरिकांनी शक्यतो खुल्या जागेत जाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घाटमाथा परिसरातून प्रवास करताना स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने जारी केलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.