
साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप! महाराष्ट्र राज्यातून ९८.९५ लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती
देशाच्या साखर उद्योगात महाराष्ट्राने यंदा आपली मोहोर उमटवली असून, उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकत उत्पादनात पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ३१ मार्च अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्पादनात मोठी झेप घेतली असली तरी, कारखान्यांचे अर्थकारण आणि आगामी मान्सूनच्या चिंतेमुळे साखर उद्योगासमोर आव्हाने कायम असल्याचे चित्र दिसत आहे.(फोटो सौजन्य – AI)
नरेंद्र मोदी स्टेडियमला टक्कर! मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा देशातील एकूण साखर उत्पादनात मोठी सुधारणा झाली आहे. ३१ मार्चपर्यंत देशात २७१.२० लाख टन साखरेची निर्मिती झाली असून, गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन २४८.६५ लाख टन इतके होते. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर उत्पादनात सुमारे २३% वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेश राज्याला मागे टाकून साखर उत्पादनामध्ये अव्वल ठरला आहे.
हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. याचा थेट परिणाम पुढील वर्षीच्या ऊस लागवडीवर आणि उपलब्धतेवर होण्याची शक्यता आहे. उत्पादन वाढले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, साखरेचा हमीभाव आणि कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा मेळ घालताना कारखानदारांची दमछाक होत आहे.त्यामुळे, महाराष्ट्राने उत्पादनात ‘नंबर १’ स्थान मिळवले असले तरी, या यशाचा आनंद साजरा करतानाच भविष्यातील अनिश्चिततेचे ढग साखर उद्योगावर कायम आहेत.
२०२५-२६ च्या हंगामात देशभरातील एकूण ५४१ साखर कारखान्यांनी गाळप प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यंदा राज्याचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवस चालला, जो गेल्या वर्षी केवळ ८३ दिवस होता.मागील वर्षी उत्तर प्रदेश ९१ लाख टनांसह देशात प्रथम क्रमांकावर होते, तर महाराष्ट्र ८०.१० लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा मात्र महाराष्ट्राने आपली स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
साखर उत्पादनाचे आकडे समाधानकारक असले तरी उद्योगापुढील तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही साखर कारखान्याचे आर्थिक गणित तेव्हाच जुळते जेव्हा तो हंगाम किमान १४० ते १५० दिवस चालतो. यंदा हंगाम वाढला असला तरी तो या निकषापर्यंत पोहोचू शकलेला नाही.राज्यातील २१० पैकी २०२ कारखान्यांची धुराडी आता शांत झाली आहेत.उर्वरित ८ कारखाने येत्या आठवड्यात आपले कामकाज बंद करण्याची शक्यता आहे.