Maharashtra Election 2024: "शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन..."; नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांचे विधान
सासवड: विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची होती. मात्र सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलेली भक्कम साथ यामुळे माझा विजय सहज मिळाला आहे. याबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद. यापुढील काळात पुरंदर हवेली तालुक्यात जास्तीत जास्त कामे करण्यात येतील. महत्वाचे म्हणजे दीड वर्षाच्या आत गुंजवणीचे पाणी पुरंदर तालुक्यातील लाभार्थी गावात फिरविणार. त्याच बरोबर विमानतळ प्रकल्प बाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होवू देता सरकार आणि शेतकरी यांच्यासोबत वाटाघाटी करून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना देण्यात येईल. आणि विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. अशी प्रतिक्रिया पुरंदर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
पुरंदर हवेली मतदार संघातून महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय जगताप यांचा २४१८८ मतांनी पराभव केला. त्या नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी पुरंदरच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय करण्यात येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. दिवे येथील आयटी पार्कच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल असेही शिवतारे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षापासून दिवसरात्र काम करून लोकांच्या मनात विश्वास केल्यानेच विजय मिळाल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्याशी दोस्तीच ठेवणार ,,,,,
पुरंदर हवेलीतील जनतेने चांगले सहकार्य केल्याने मला २४ हजारांची आघाडी मिळाली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साथ दिली असती तर आणखी १० ते १५ हजार मतांची वाढ झाली असती. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात त्यांनी माझ्या विरोधात काम केले असले तरी मी मात्र त्यांना एकदा दोस्तीचा हाथ दिला असून कायम दोस्तीच निभावणार अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रातील सरकारच्या आवाहनाला महाराष्ट्र राज्यातील जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारला केंद्राची मदत मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल. लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला पुढे नेण्याचे काम करतील हा विश्वास असल्यानेच भगव्याचे सरकार आले आहे.
राज्यात हिंदुत्वाची लाट आली आहे लाडक्या बहिणींनी पूर्ण ताकद महायुती सरकारच्या पाठीमागे उभी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय शिवतारे यांच्या रूपाने पुरंदरचा गड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे एकमेव असल्याने त्यांना कॅबिनेट पद मिळून मंत्री होतील. आणि तालुक्यातील गुंजवणी आणि इतर प्रकल्प पूर्ण होतील. पाठीमागील वर्षे वाया गेल्याने तालुका विकासापासून वंचित होता. त्यामुळे शिवतारे यांना निवडून आणण्यासाठी महा युतीच्या सर्व नेत्यांनी एकदिलाने काम केल्याने विजय मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर मध्ये संभाजीराव झेंडे यांची दिलेली उमेदवारी विजय शिवतारे यांचा विजय निश्चित करण्यासाठीच दिली होती. अजित पवार राज्यातील एक मातब्बर आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे शिवतारे यांचा विजय सुकर व्हावा यासाठीच झेंडे यांना मैदानात उतरविले आहे. विजय शिवतारे स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.