पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन (फोटो- यूट्यूब)
आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने राज्यात अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याचे म्हटले जात आहे. तर आता या आकडेवारीमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेता देखील पाहायला मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र आणि झारखंडच्या जनतेचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज आपण या ठिकाणी एक ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज महाराष्ट्रात विकासाचा विजय झाला आहे. तर खोटे राजकरण करणारे पूर्णपणे पराभूत झाले आहेत. आज नकारात्मक राजकरण हरले आहे. आज परिवारवादाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राने आज विकसित भारताच्या संकल्पनेला मजबूत केले आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो.”
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा देतो. देशात झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपला यश मिळाले आहे. यावर देशाला विकास हवा आहे हे स्पष्ट झाले आहे. मी महाराष्ट्रातील माता, भगिनी, शेतकरी आणि तरुण यांना आदरपूर्वक नमन करतो. झारखंडच्या जनतेला देखील आम्ही नमन करतो. यावेळी महाराष्ट्राने जुने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 50 वर्षांमधील हा सर्वात मोठा विजय आहे. तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले” अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 ल ते मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. तसेच 2022 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यात त्यान यश आले. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून ओळखले जाते. तसेच शरद पवार यांना राजकारणातले वस्ताद म्हटले जाते. मात्र शरद पवार यांना तोडीस तोड नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते.