बेळणे चोरी प्रकरणामधील मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक (फोटो सौजन्य - pinterest)
कणकवली पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी बेळणे चोरी प्रकरणामधील अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोराला पकडण्यासाठी कणकवली पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर आता या चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ठाणे शहरातील पाचपाखाडी परिसरातून या चोराला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाई नंतर सर्वत्र कणकवली पोलीसांचं कौतुक केलं जात आहे.
हेदेखील वाचा- धक्कादायक! लसणाच्या नावाखाली विकल्या जात आहेत सिमेंटच्या पाकळ्या; अकोल्यामधील घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सतीश सिताराम दळवी (वय ५६) हे कणकवली तालुक्याच्या बेळणे खुर्द येथील रहिवासी आहेत. तिथे त्यांच्या मालकिची बंद स्वरूपात असलेली फॅब्रिकेशन कंपनी आहे. सतीश दळवी यांनी २९ जुलै रोजी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या मालकीची बंद स्वरूपात असलेली फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेलं आहे. या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी नागेश चंद्रकांत बोभाटे (वय २९) याला पोलिसांनी पाचपाखाडी येथून अटक केली आहे. कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी चोऱ्या करत असल्याची कबुली नागेश याने प्राथमिक चौकशी दिली आहे.
बेळणे येथील फॅब्रिकेशन कंपनीत कटिंग मशीन,पॉवर प्रेस मशीनचे गियर, रॅम्,प्लेट, इलेक्ट्रिक मोटर,हॅन्ड प्रेस मशीन,पाईप बेंडिंग मशीनचे गिअरबॉक्स, इलेक्ट्रिक मोटर, बेडींग टूल,बेंच ग्रॅन्डर मशीन्स वगैरे साहित्यासह फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये नागेश चंद्रकांत बोभाटे हा मुख्य आरोपी होता. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर १७ ऑगस्ट रोजी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी ठाणे पाचपाखडी येथे सापळा रचून नागेशला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे.
हेदेखील वाचा- मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन; ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला
यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यामधील आरोपी संदीप पांडुरंग चाळके (वय ३९ वर्षे) याला अटक केली होती. परंतु या गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी नागेश बोभाटे हा पोलिसांच्या निशाण्यावर होता. नागेश बोभाटे हा कर्जबाजारी होता, तसेच त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्याचे व्यसन देखील जडले होते. त्या व्यसनांमधून त्याने सतीश दळवी यांच्या फॅब्रिकेशन कंपनीमधून वेगवेगळ्या मशिनरीचे लोखंडी पार्ट्स चोरी केले होते. गुन्हा घडल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता.
कर्जबाजारी झाल्यामुळे मागील एक वर्षापासून राहत्या घरातून निघून गेला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तांत्रिक तपासाद्वारे सदरचा आरोपी हा मुंबई, ठाणे परिसरात एका ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बसस्थानके या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे शोधून काढले. अखेर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी पाचपाखाडी, जिल्हा ठाणे परिसरात काल १७ ऑगस्ट रोजी पहाटेपासून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.