Mumbai Pune Expressway Accident News In Marathi : शनिवार ठरला घातवार! विकेंड म्हटला की मुंबई पुणे एक्सप्रेवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मात्र हाच विकेंड आता जीवघेणा ठरला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 15 ते 20 गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. उतारावर ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने या सर्व गाड्यांना उडवले आहे,अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मुंबई लेनवर खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बोगदा पासून फुडमॉल हॉटेल पर्यंत अनेक चारचाकी व मोठ्या गाड्यांना ठोकर बसली आहे . एक महिला ठार झाल्याची माहिती मिळाली असून बरेच जणांना दुखापती झाल्या आहेत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा अपघात बोरघाटात झाल्याचं सांगितलं आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा मुंबई गोवा हायवे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं सत्र सुरु असतं. दरम्यान आज बोरघाटात 15 ते 20 गाड्यांचा चक्काचूर झाल्याची भितीदायक घटना घडली असून यात 25 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचाव पथकाने दाखल होत अपघातातील जखमींना बाहेर काढले आहेत सध्या या जखमींवर पनवेल आणि खोपोलीमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे.
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा खंडाळा घाटात ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहमचालकाचा ट्रेलरवरील नियंत्रण सुटलं. अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. ब्रेक फेल झाल्याने हा ट्रेलर दीड ते दोन किलोमीटरपर्यंतच्या वाहनांना धडक देत पुढे जात राहिला. त्यामुळे घाटातील वाहनांचे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. हा अपघात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला असल्याने सध्या एक्सप्रेसववेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. स्थानिक आणि पोलीस यंत्रणेच्या मदतीने अपघातात चेंदामेंदा झालेल्या वाहनांना बाजूला करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे आता घाटातील वाहतूक पुर्वपदावर येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.