६५ वर्षावरील ४८८ लाडक्या बहिणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट असतानाही काही कुटुंबातील तीन-चार जणींनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच 65 वर्षांवरील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय 21 ते 65 वर्षे महिलांनी कमी तर काहींनी वयोमर्यादा ओलांडली असल्याचे पडताळणीतून आढळून आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यात 65 वर्षांवरील तब्बल 488 लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. तर जिल्ह्यातील 14588 घरात 2 पेक्षा अधिक लाभार्थी निदर्शनास आले आहेत. त्यामुळे या लाडक्या बहिणींचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत.
महिला व मुलींना स्वावलंबी आणि राज्य आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनातर्फे गत वर्षी जुलै महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू झाल्याने लाभाचे नियम, अटींकडे फारसे लक्ष केंद्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही महिलांनी कुटुंबात चारचाकी असो, संजय गांधी योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असतानाही नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय काही कुटुंबातील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून सर्वेक्षण करून फेरपडताळणी करण्यात आली. जिल्ह्यात २.६३ महिलांनी नोंदणी केली होती. यातील २.६१ लाखांवर महिला पात्र ठरल्या होत्या.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्रे देऊन लाभ उचलल्याचे उघड झाले. यामुळे महिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात २१ वर्षेपेक्षा कमी असलेले व ६५ वषपिक्षा जास्त वयोमर्यादा असलेले एकूण ५४२ महिला आढळून आल्याने संबंधितांना अपात्र ठरविण्यात आले.
२१९६ एका कुटुंबातील लाभार्थी ठरले अपात्र
एका कुटुंबात २ पेक्षा अधिक लाभार्थीची फेरपडताळणी केली असता जिल्हाभरात एकूण १४५८८ कुटुंबांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पात्र अविवाहित २०३१, पात्र विवाहित १०३६१ असे एकूण १२३९२ कुटुंब पात्र ठरली. तर २१९६ लाडक्या बहिणीचा योजनेतून पत्ता कट करण्यात आला.
२१ वर्षे आत व ६५ वर्षेपेक्षा अधिक तरी घेतला लाभ
लाडकी बहीण योजेनेसाठी २१ वर्ष किमान वय तसेच ६५ वयोमर्यादा असणे बंधनकारक आहे. मात्र, काहींनी १९, २० वर्षे असतानाही लाभ घेतल्याचे तसेच ६५ पेक्षा अधिक असलेल्यांनीही लाभार्थी यादीत समावेश असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात २१ ते ६५ गटात एकूण ३७०९ लाभार्थींची नोदणी करण्यात फेरपडताळणी करण्यात आली.