नोकरी, बंगला, जमीन वय 40 तरी लग्न जमेना
रांजणी / रमेश जाधव : शिक्षण, पैसा, प्रॉपर्टीबाबत अवाजवी अपेक्षा वाढल्यामुळे विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांची लग्न जुळवताना प्रचंड दमछाक होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. घरदार, नोकरी, बँक बॅलन्स व्यवस्थित असतानाही विवाह इच्छुक मुलांनी वयाची चाळीशी गाठली आहे. शेतकरी तसेच 25 ते 30 हजार पगाराची नोकरी करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याची सध्याची खरी आणि वास्तव वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.
खरं तर मुलांची लग्न करताना अनेक कारणे समोर येत आहेत. सध्याच्या मुलींना शेतकरी मुलगा नकोच आहे, त्याचबरोबर या मुलींना मुलाचे आई-वडील नको, मुलींना मुलाची नोकरी आणि निवासस्थान देखील एकाच शहरात नको. बऱ्याच मुलींना मुलाचे आई-वडील नको असं अनेकदा लग्न जमवतेवेळी अनुभवायला मिळत आहे. सामान्य घरातील 15 ते 20 हजार रुपये महिन्याला कमविणाऱ्या मुलाशी लग्न करायला मुलींची मानसिकता नसल्याचे दिसून येते.
हेदेखील वाचा : Anandacha Shidha: यंदा आनंदाचा शीधा’ नाही, शिवभोजन थाळीत काटकसर; लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका
मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. मुलगी आता स्वयंपूर्ण झाली आहे. तिला स्वतःच्या नोकरीत मिळणाऱ्या पॅकेजपेक्षा जास्तच पॅकेज मुलाकडून अपेक्षित आहे. पदवीपर्यंत शिक्षण असलेल्या मुलीही आता मुलाच्या किमान पगाराची अपेक्षा 50 हजारापर्यंत आहे. शहरातील विवाह संस्थांकडे नोंदणी होत असलेल्या एकाही मुलीला शेतकरी मुलगा नकोच आहे. एवढेच काय तर शेतकऱ्याच्या मुलीलाही शेतकरी नवरा नको आहे. शेती भरपूर असली तरी शेतीवर अवलंबून असलेल्या मुलाला पसंत करायला मुली तयारच होत नाहीत ही सध्याची खरी वस्तुस्थिती आहे.
अपेक्षा ठेवल्याने वाढत जातंय वय
मुलांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवून स्थिरस्थावर होईपर्यंत साधारणतः वयाची तीस वर्षे होतात, त्यानंतर मुलीचा शोध सुरू होतो. सुरुवातीला अपेक्षा जास्त असतात. त्यातच वयाची 35 ओलांडून जाते. पुढे अपेक्षांची तडजोड न केल्यास मुलांचे लग्न रखडते. या सर्व बाबी पाहता मुलाची चाळीशी ओलांडून जाते. तरी देखील त्याचे लग्न जमत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
मुलींना शेतकरी मुलगा नको
शहरातील विवाह संस्थांकडे नोंदणी होत असलेल्या एकाही मुलीला शेतकरी मुलगा नको असल्याचे दिसून येते. तसेच ग्रामीण भागात देखील आता विवाह संस्था सुरू झाल्या असून, या विवाह संस्थांमध्ये देखील ग्रामीण मुलींना शेतकरी नवरा नको असल्याचे दिसून आले आहे.