मनोज जरांगे पाटील यांची OBC आरक्षणावर प्रतिक्रिया
जालना : राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसले होते. मात्र सरकारच्या मध्यस्थीनंतर जरांगे पाटील यांनी आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे शब्दासह ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरत उपोषण केले आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे.
ओबीसींना आरक्षण असून ते इतके लढत आहेत
माध्यमांशी संवाद साधत मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्ही सांगितलेल्या व्याख्येप्रमाणेच सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी. सगळे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया 13 जुलै आधी करावी. शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी. बॉम्बे गर्व्हमेन्ट गॅजेट, सातारा गर्व्हमेन्ट गॅजेट, जे आमचे ठरलेले विषय, मागण्या आहेत, त्या पूर्ण कराव्यात. 13 जुलैच्या आधी मराठ्यांना ओबीसीच्या अंतर्गत तेही 50 टक्क्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसींना आरक्षण असून ते इतके लढत आहेत. आम्हाला तर आरक्षणच नाही, मग आम्ही किती लढलं पाहिजे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आरक्षण असणारे असे लढायला लागले, तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीने लढतील. माझ्या मराठ्याला आरक्षण नाही. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला असून आम्हाला मिळू नये म्हणून इतके लढताय. मग, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून किती ताकदीने लढू,’आता असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठे आरक्षण ओबीसीतूनच घेणार
पुढे ते म्हणाले, ‘मराठ्यांच्या विरोधात विष ओकायला लागलेत. आमचेही मराठे मतभेद सोडून जातीच्या लेकरासाठी लढतील. आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना मराठे आता उघडे पाडल्याशिवाय राहणार नाहीत. घराघरातले मराठे जागे झालेत. मराठे आरक्षण ओबीसीतूनच घेणार. घरात मतभेद असेल तरी ते आम्ही बाजूला ठेवू. शेतकरी, माथाडी कामगार, रिक्षावाले सगळे मराठे एक होतील. खानदानी मराठे मतभेद सोडून एकत्र येणार,’असे ठाम मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले