नागपुरामध्ये अत्तराच्या गोडाऊनला भीषण आग
नागपूर शहरातील इतवारी परिसरात एका अत्तराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरात आठवड्याभरात आज दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. दुकानाला लागलेली आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली आणि या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा दुर्वैवी मृत्यू झाला.
हेदेखील वाचा- हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर शहरातील इतवारी परिसरात तीन नल चौकात प्रवीण बागडे यांचे श्री रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. तळमजल्यावर दुकान असून त्याच्या पहिल्यावर प्लास्टिकचे गोडाऊन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर प्रवीण बागडे यांचे कुटूंब राहते. आज पहाटेच्या सुमरास त्यांच्या श्री रेणुका नॉव्हेल्टी दुकानाला अचानक आग लागली. आग अत्यंत भीषण होती. कालांतराने ही आग वाढत गेली, आणि पहिल्या मजल्यावरील प्लास्टिकच्या गोडाऊनला देखील आग लागली. या अत्तरच्या दुकानात इतर केमिकलचा वापर होत असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं.
हेदेखील वाचा- मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली; पवना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ
प्लास्टिकने भीषण पेट घेतल्यानंतर आग शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचली जिथे संपूर्ण कुटूंब झोपलं होतं. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीमुळे प्रवीण बागडे आणि कुटूंबामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं होतं. या आगीत प्रवीण बागडे यांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला असून प्रवीण बागडे, त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवीण बागडे, त्यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे घरातील सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. ही आठवडाभरातील दुसरी आग लागल्याची घटना आहे.
31 जुलै रोजी देखील नागपुरच्या इतवारी परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. नागपूरच्या जुना भंडारा रोडवर असलेल्या इतवारी परीसरातील आहुजा पेनमार्ट नावाच्या स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निमुळत्या गल्ल्या आणि पेंट मध्ये असलेल्या ज्वलनशीर पदार्थामुळे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना आग विझवायला मोठी कसरत करावी लागली. या घटनेत दुकान आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शर्थीच्या प्रयत्नांनतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा इतवारी परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे.