हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी (फोटो सौजन्य - istock)
राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार सुरु असणाऱ्या पावसाचा जोर आता काही जिल्ह्यात ओसरला आहे. मात्र काही भागांत अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. तर मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पाालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पावासाचा जोर ओसरल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस नसल्याने शेतकरी शेतीची कामे आटोपून घेत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची रीपरीप कायम आहे.
हेदेखील वाचा- 7 वर्षे परफ्यूम वापरला पण सुगंधाने एकही तरूणी जवळ आली नाही; तरूणाची कोर्टात धाव
हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासोबतच हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- बदलापूरमध्ये एमआयडीसी कंपनीत रिऍक्टरचा भीषण स्फोट; एका कुटुंबातील तिघे जखमी
पुण्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुण्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला होता. पुण्यातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. आज हवामान विभागाने पुण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात पुढील 4 ते 5 दिवस तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ आहे. तर साताऱ्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात उद्या हवामान विभगाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला उद्या 7 ऑगस्ट रोजी आणि साताऱ्याच्या घाट विभागात 7 आणि 8 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात पुढील 24 तासांत 65.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात 7 ते 11ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे उद्या 8ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 8 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भासाठी पुढील चार ते पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.