
सैदापूर येथे चायनीज सेंटर हॉटेलला आग; 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान
कराड : सैदापूर (ता.कराड) येथे ओम साई कॉम्प्लेक्स इमारतीत चायनीज सेंटर हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक साहित्य या आगीत जळून खाक झाले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याबाबत ज्ञानेश्वर कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथील जे. के. पेट्रोल पंपाजवळ ओम साई कॉम्प्लेक्स असून, त्याठिकाणी ज्ञानेश्वर कुंभार यांचे डी. के. चायनीज बिर्याणी कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दिवसभर हॉटेल सुरू होते. रात्री उशिरा ज्ञानेश्वर कुंभार यांनी ते बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले. पहाटे या हॉटेलला अचानक आग लागली. आगीत हॉटेलमधील 8 प्लास्टिकचे टेबल, 32 खुर्च्या, स्वयंपाकगृहातील भांडी, फ्रिज, डायनिंग हॉलमधील लाईट बोर्ड, पार्टिशन केलेल्या स्लायडिंग खिडक्या, अंतर्गत शोसाठी केलेला पीओपी डिझाईन, मैदा, नुडल्सचे पोते तसेच तांदळाची पोती जळून 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, चायनीज सेंटरला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हॉटेलमालक कुंभार यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेलला ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शनिवार पेठेतही लागली होती आग
यापूर्वी, कराडच्या शनिवार पेठेतील खाजा खिजर दर्गा परिसरात पान शॉप साहित्याच्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. त्यावेळी त्या आगीत सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत जमीर आमिन खान (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
हेदेखील वाचा : Mumbai: शहराचे आर्थिक व पर्यावरणीय भविष्य साकारतेय! IMC च्या बैठकीत कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदलावर मंथन