
पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग;
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील प्राईम स्क्वेअर या बहुमजली कमर्शियल इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पिंपरी मुख्य केंद्रातून २, थेरगाव उपकेंद्रातून १ आणि नेहरूनगर केंद्रातून १ अशा चार अग्निशमन पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.
इमारतीच्या आत दाट धूर आणि प्रखर ज्वाळांमुळे जवानांना आत प्रवेश करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. तरीही धाडस आणि तत्परता दाखवत पथकाने पाचव्या मजल्यावर अडकलेल्या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले. चौथ्या मजल्यावरील कोचिंग क्लासमध्ये एकूण ४२ विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी त्वरित १०१ वर कळवले आणि अग्निशमन दलाने अल्पावधीत दाखवलेल्या चपळ प्रतिसादामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
कारवाईदरम्यान वरिष्ठ अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उपअग्निशमन अधिकारी विनायक नाळे, गौतम इंगवले, प्रभारी अधिकारी रुपेश जाधव, वाहनचालक मयूर कुंभार, विशाल बानेकर, दत्तात्रय रोकडे, मारुती गुजर तसेच महिला कर्मचारी स्नेहा जगताप आणि इतर जवानांनी सहभाग घेत पूर्ण क्षमतेने आग विझवण्याचे कार्य केले. अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ १०१ वर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाची तत्परता उल्लेखनीय
पिंपळे सौदागर येथील घटनेत स्थानिकांनी आणि अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद आहे. दलाने दाखवलेले धैर्य आणि संयम उल्लेखनीय आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
संभाव्य नुकसानाची व्याप्ती खूप मोठी होती
या आगीत संभाव्य नुकसानाची व्याप्ती खूप मोठी होती. अन्य व्यवसायांतील गर्दी किंवा शेजारच्या इमारतींमध्ये आग पसरली असती तर नियंत्रण ठेवणे कठीण झाले असते. आमचे पथक काही मिनिटांत रवाना झाले आणि पूर्ण क्षमतेने काम केले. पिंपळे सौदागर परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची नितांत आवश्यकता असून, याबाबत तातडीची कार्यवाही होणे आवश्यक आहे.
– ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.
हेदेखील वाचा : मोठी बातमी! खेर्डी हादरली; MIDC मधील ‘या’ प्रसिद्ध कंपनीला भीषण आग