राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभवाचा सामना केल्यानंतर महाविकास आघाडीने या निवडणुकासांसाठी मोठी तयारी सुरू आहे. खास बाब म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आता सर्वात जास्त सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर गटातील नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शनिवारी ( 17 मे) शिवसेना भवन येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
कोणत्या वॉर्डात किती ताकद?
निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने पक्षातील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदार्या दिल्या आहेत. संबंधित नेत्याल्या जबाबदारी दिलेल्या भागांतील माहिती गोळा करण्यासह, कोणते वॉर्ड किंवा मतदारसंघ लढवायचे आहेत याचीही माहिती मागवण्यात आली आहे. यासाठीचा तपशीलवार अहवाल १९ जूनपर्यंत शिवसेना भवनात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नेत्यांच्या नियोजित दौर्यांद्वारे, स्थानिक जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत.
ज्या नेत्यांना विशिष्ट जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी त्या-त्या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्याचे आदेश शिवसेना भवन येथून देण्यात आले आहेत. यासोबतच, संबंधित भागांतील शिवसेनेचे संघटन सध्या किती मजबूत आहे, याचीही माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः 2012 आणि 2017 मधील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ज्या मतदारसंघांत कोणत्या स्थितीत होती, त्या निकालांचा अभ्यास करून सध्याच्या राजकीय ताकदीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.
आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संघटनात्मक तयारी जोरात सुरू झाली आहे. यासाठी शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र रचना आखण्यात आली असून, प्रत्येक पातळीवर कार्यकर्त्यांची १० जणांची टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी रचना
शहरी भागासाठी खालीलप्रमाणे संघटनात्मक आराखडा ठरवण्यात आला आहे:
शहरप्रमुख
उपशहरप्रमुख
प्रभागप्रमुख
उपविभागप्रमुख (प्रत्येकी दोन वॉर्डसाठी)
शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख (प्रत्येक वॉर्डसाठी)
गटप्रमुख
१० जणांची कार्यकर्त्यांची टीम
तर ग्रामीण भागात:
तालुकाप्रमुख
उपतालुकाप्रमुख
शाखाप्रमुख (गाव पातळीवर)
बूथप्रमुख
या रचनेची पूर्ण यादी आणि संबंधित भागातील कोणते वॉर्ड अथवा मतदारसंघ लढवायचे आहेत, याची माहिती १९ जूनपर्यंत शिवसेना भवनात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील विविध महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ठाकरे गटाने वरिष्ठ नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भायंदर – सुभाष देसाई, राजन विचारे
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर – संजय राऊत
धुळे, अहिल्यानगर – अनिल परब, संजय राऊत
कल्याण-डोंबिवली – अनिल परब
उल्हासनगर, पनवेल शहर – अनंत गिते
अमरावती, अकोला – अरविंद सावंत
नागपूर, चंद्रपूर – भास्कर जाधव
वसई-विरार, भिवंडी-निजामपूर शहर – विनायक राऊत
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
लातूर, सोलापूर – चंद्रकांत खैरे
परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर – अंबादास दानवे