
पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क 'एबी फॉर्म' फाडून खाल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग ३६ (अ) मध्ये उमेदवारीवरून मागील दोन दिवसांपासून पक्षात अंतर्गत कलह सुरू होता. एकाच प्रभागात दोन जणांना ‘एबी फॉर्म’ देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी जेव्हा मच्छिंद्र ढवळे आपला अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, तेव्हा उद्धव कांबळे यांनी त्यांचा फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकला.
आपला पत्ता कट होणार असल्याचे लक्षात येताच उद्धव कांबळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकारानंतर ढवळे आणि कांबळे समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले.
या घटनेमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेतृत्वावर आणि उमेदवारी वाटपाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना अधिकृत पत्र मिळाल्याने हा विसंवाद उफाळून आला. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून मतदारांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत युती राजकारणाचा एक नवीन राजकीय प्रयोग उदयास आला आहे, ज्यामुळे तीन आघाड्या निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात दोन आघाड्या होत्या: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती (महायुती) आणि शिवसेना (यूबीटी) च्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (महाविकास आघाडी). पुणे महानगरपालिका निवडणुकीत तिसरी आघाडी उदयास आली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आपले नशीब आजमावत आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे. परिणामी, अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीवरून मुंबईत महायुती (महायुती) पासून फुटलेल्या काँग्रेसने पुण्यात त्याच ठाकरे बंधूंशी हातमिळवणी केली आहे.