
MBBS विद्यार्थ्याच्या तत्परतेने दुचाकीस्वाराचा जीव वाचला
मुंबई–सुरत एक्सप्रेस हायवेवर संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की त्याचा एक हात पूर्णपणे तुटला, डोक्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला, तर श्वासोच्छ्वास आणि नाडी पूर्णतः थांबली होती.
अपघातानंतर काहीच क्षणांत घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली, मोबाईल कॅमेरे रेकॉर्डिंगसाठी पुढे सरसावले, पण प्रत्यक्ष मदतीसाठी कुणीही पाऊल उचलत नव्हते. वेळ हातातून निसटत असताना माणुसकीचा हात पुढे केला तो संकेत शहादेव नागरे याने जो वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सासवंद येथील MBBS अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.
Solapur News: शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
परिस्थितीची गंभीरता ओळखत, संकेतने सर्वप्रथम जमलेल्या गर्दीला मागे हटवून जखमीच्या आजूबाजूला सुरक्षित जागा निर्माण केली, जे आपत्कालीन उपचारांमधील पहिलं महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. त्यानंतर प्राथमिक तपासणीत रुग्णाची नाडी न चालणे, श्वासोच्छ्वास थांबणे, रक्तदाब नसणे आणि शॉकची स्पष्ट चिन्हे दिसताच, संकेतने कोणताही विलंब न लावता तत्काळ CPR (Cardio Pulmonary Resuscitation) व BLS (Basic Life Support) देण्यास सुरुवात केली.
अंदाजे 10 ते 15 मिनिटांच्या अखंड, सातत्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक उपचारानंतर जखमी तरुण सागर बोलाडा याने हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात केली. नंतर काही सेकंदांत हृदयाची गतीही परत येऊ लागली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही घटना त्यांच्या डोळ्यांनी पहिली.
घटनास्थळी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने आणि वेळेचे भान ठेवून,संकेतने वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रक्तस्राव नियंत्रित करत तातडीने खासगी रिक्षामधून रुग्णाला वेदांता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे हलवले. तेथे आपत्कालीन विभागातील डॉक्टरांनी त्वरीत उपचार सुरू केले आणि सागर बोलाडा याची प्रकृती स्थिर करण्यात यश आले.
या संपूर्ण घटनेनंतर, डॉ. नागरे यांच्या धाडसी, संवेदनशील आणि व्यावसायिक पुढाकाराचे वेदांता मेडिकल कॉलेज प्रशासन, सहकारी विद्यार्थी, तसेच नागरिकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. यामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली की वैद्यकीय शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते नसते, तर संकटाच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे तितकेच आवश्यक आहे.