
ऊस दराबाबतची बैठक निष्फळ शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा
कोल्हापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांची भूमिका मान्य नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास बैठक घेऊनही कोणताही तोडगा निघाला नाही. ‘एफआरपी’ची मोडतोड करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली.
बैठकीतील चर्चेवर आम्ही समाधानी नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले की, दराबाबत जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत आम्ही जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. उद्यापासून एक देखील साखर कारखाना चालू करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले आहेत.
सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत, असेही राजू शेट्टी म्हणाले.
गेल्यावर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीही साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला, तर मुख्यमंत्री ५ नोंव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तयारी करावी, असे आवाहन केले आहे.
२०० रूपये दुसरा हफ्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू करणार नाही
दुसरीकडे, चालू वर्षी गळीत हंगामात पहिली उचल ३७५१ रूपये व गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला २०० रूपये दुसरा हप्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरलापुरात (जि. बेळगांव) दिला. बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील कारखाने ३ हजार रूपये पहिली उचल देण्यावर ठाम राहिले आहेत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकी केली असून साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून धरली आहे.