गोंदिया: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या गतीने विकास कार्य केले जात आहे. जनतेने सरकारच्या विकास कार्याला साथ देऊन भारत देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन, गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारत येथे विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा या विषयावर आयोजित केलेल्या मल्टिमीडिया छायचित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मंचावर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तहसिलदार शमशेर पठाण, तहसिलदार श्रीकांत कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
मंगल प्रभात लोढा पुढे बोलतांना म्हणाले की, मागील ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशात विकास कार्याला महत्व देऊन मोठ्या गतीने देशाचा विकास केला आहे. आज जागतिक स्तरावर देश महासत्ता होण्याच्या दिशेने गतीने वाटचाल करीत आहे. विकास कार्य करीत असतांना शत्रु राष्ट्राकडून आपल्या विकास कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आपल्या शुरवीर सैनिकांनी शत्रु राष्ट्रांचा हा डाव अनेकदा हाणून पाडला आहे. देशातील सर्व जनतेनेही देशाला महासत्ता करण्यासाठी मोदी सरकारच्या विकास कार्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
या प्रदर्शनात मोदी सरकारने मागील ११ वर्षात केलेल्या विकास कार्याची सविस्तर माहिती दिली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो यांनी अत्यंत सुंदर असा उपक्रम प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी सदर प्रदर्शनातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचे तांत्रिक सहायक संजय तिवारी यांनी केले.