
एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे भाजप सत्तेत; मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
२०१४ पर्यंत महाराष्ट्रात भाजपाची ताकद फार मोठी नव्हती, हे स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्य केले आहे. मात्र, आमच्या उठावामुळेच सत्तेबाहेर असलेली भाजपा पुन्हा सत्तेत आली आणि महायुती मजबूत झाली. भाजपाला ताकद देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनीच केले, असे ठाम मत देसाई यांनी व्यक्त केले. मरळी (ता. पाटण) येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी, भाजप – शिवसेना युती, उठाव आणि सध्याच्या राजकीय घडामो़डींवर भाष्य केले.
देसाई म्हणाले, २०२२ साली महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्ही सत्तेत होतो. आम्हाला सत्तेतून बाहेर पडायची गरज नव्हती. परंतु युती टिकवण्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ५० आमदारांसह उठाव केला. पुढे काय होईल, बहुमत मिळेल का नाही, काय परिस्थिती निर्माण होईल, याचा कोणताही विचार न करता महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला. परिणामी सत्तेबाहेर असलेली भाजपा पुन्हा सत्तेत आली आणि आज भाजपाला मोठा वाटा मिळाला.
पुढे बोलताना देसाई म्हणाले, २०१४ पर्यंत शिवसेनाच मोठा पक्ष होता. भाजपाची ताकद मर्यादित होती. पण आमच्या उठावानंतर राज्यात झालेल्या स्थित्यंतरामुळे भाजपा अधिक बळकट झाली. आज ती ताकदवान झाली आहे. या घडामोडींचा मागोवा घेताना मंगलप्रभात लोढा यांनी मागे वळून पाहिले पाहिजे.
प्रभावी योजनांची अंमलबजावणी यशाची गुरुकिल्ली
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, १ रुपयात विमा योजना, महिलांसाठी एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत, तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबविलेल्या विविध योजना या सर्व योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या. या योजनांमुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आणि याचे श्रेय पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाते, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
उठावामुळेच भाजपा परत सत्तेवर
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हा आम्ही त्या सरकारमध्ये होतो. तरीही राज्यहितासाठी आणि युती टिकवण्यासाठी आम्ही ५० आमदारांसह उठाव केला. त्या उठावामुळेच राज्यात राजकीय स्थित्यंतर घडले, सरकार उलटले आणि भाजपाची सत्ता परत आली. ही सर्व कारणांची साखळी समजून घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही देसाई यांनी दिला.