भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली असली तरी या निर्णयावरून आता राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे वर्सोवा येथील जागा वन विभागाच्या नियंत्रणात असून येथे टोल नाका उभारण्यास वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मुंबईतील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी दहिसर पथकर नाका वर्सोव्याला हलवला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. यामुळे मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असा दावा त्यांनी केला. याचबरोबर प्रत्यक्ष कामकाज सुरू असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
या घोषणेनंतर मिरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात मात्र विरोधाची लाट उसळली आहे. वर्सोवा परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद असून टोल नाका उभारल्यास मोठा ताण घोडबंदर गावावर पडेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.अवजड वाहनांवर होणारी शुल्क आकारणी थेट मिरा-भाईंदरकरांच्या माथी मारली जाईल, अशीही नाराजी व्यक्त होत आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल, असे वसई-विरारकरांचे म्हणणे आहे.सर्वसामान्य प्रवाशांना ‘दहिसर’ गाठण्याची आवश्यकता नसतानाही टोल भरावा लागेल, अशी चिंता नागरिक संघटनांकडून मांडली जात आहे.
नुकत्याच वाशी येथे झालेल्या लोकदरबारात भूमिपुत्र संघटनेकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की,वर्सोवा परिसरातील जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली येते.रस्ता अरुंद असल्याने टोल नाक्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होईल.त्यामुळे येथे कोणतेही बांधकाम करण्यास आमचा स्पष्ट नकार आहे.
भूमिपुत्र संघटनेचे नेते सुशांत पाटील यांनी या संदर्भात गंभीर आक्षेप घेतले आहेत.राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसीचा विद्यमान टोल नाका बेकायदेशीर आहे, असा त्यांचा आरोप आहे.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दहिसर टोल नाका सप्टेंबर २०२७ पर्यंत बंद होणे आवश्यक आहे.तरीदेखील नाक्याचे स्थलांतर करून लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या वादामुळे आगामी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे गटाची अडचण वाढवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी घोषणेला वनमंत्र्यांच्या भूमिकेमुळे खीळ बसली असून, भाजप-शिवसेना (शिंदे गट) संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.एकीकडे प्रवाशांना दिलासा देण्याच्या नावाखाली नाक्याचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे पर्यावरण, वाहतूक कोंडी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी या निर्णयाला अडथळा आणत आहेत. परिणामी दहिसर पथकर नाका वर्सोवा स्थलांतराचा निर्णय सध्या तरी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.